विठ्ठल कदम, ठाणे 

ठाणे परिसरातील विविध ठिकाणांहून मंत्रालय येथे जाणाऱ्या १९ बसफेऱ्या मासिक पास नसल्याचे कारण दाखवीत राज्य परिवहनने बंद केल्या होत्या. मात्र या मार्गावरील हजारो प्रवाशांनी या अन्यायकारक फतव्याविरुद्ध शासन स्तरावर दाद मागितल्यानंतर पुन्हा या सेवा पूर्ववत करण्यात आल्या. मात्र रेतीबंदर-मंत्रालय सेवा बंदच ठेवण्यात आली. या अन्यायाला वाचा फोडण्यात रेतीबंदर परिसरातील प्रवाशांनी पुढाकार घेतल्यानेच आमची फेरी पूर्ववत सुरू झालेली नाही का?

आम्हाला तरी तसाच संशय येतोय. कारण या मार्गावरील प्रवासी संख्या खूप असल्याने बसफेरी तोटय़ात जाण्याची अजिबात शक्यता नाही. सध्या बस नसल्याने आम्हा रेतीबंदरवासीयांचे बरेच हाल होत आहेत. अधिक वेळ आणि पैसा खर्च होत आहे. सकाळी येताना खारेगांव ते कलवा नाका, कळवा नाका ते ठाणे स्थानक आणि तिथून लोकल पकडून मुंबई असा द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

रेतीबंदर-मंत्रालय बससेवा व्हाया ऐरोली जात असल्याने नवी मुंबईकर प्रवाशांचीही सोय होत होती आणि एस.टी. प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळत होते. अशा प्रकारे प्रवासी आणि प्रशासन हा दोघोंचे हित असल्याने रेतीबंदर-मुंबई बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी कळकळीची विनंती.

कल्याणचा फलाट १ए प्रवाशांसाठी डोकेदुखी

अरविंद बुधकर, कल्याण</strong>

कल्याणसाठी कल्याणहून गाडी सुटावी म्हणून रेल्वेने होम प्लॅटफॉर्मची सोय केली. त्याचा उद्देश कसाराच्या दिशेने लोकल /लांबपल्याच्या गाडय़ा या फलाटावरून जाव्यात हाही होता. काही दिवस लांबपल्ल्याच्या गाडय़ा या फलाटावरून जातही होत्या. खरे म्हणजे फलाट क्रमांक १ए वर असलेले दोन्ही जिने/पादचारी पूल चढताना प्रवाशांना फार त्रास होतो. मुख्यत्वे या त्रासाला ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नवीन पुलावरून तसेच स्कायवॉकवरून चालायची सोय नाही. कारण या ठिकाणी महापालिकेचे जावई फेरीवाले आणि युनियनचे पदाधिकारी (नगरसेवक) यांच्या आशीर्वादाने दुकाने मांडून बसलेले आहेत. रेल्वे प्रशासनास सुचवावेसे वाटते की, त्यांनी फलाट क्रमांक १ए वरून दररोज कसारा दिशेने जाणाऱ्या गाडय़ा सोडाव्यात. त्याचप्रमाणे फलाट क्रमांक  १ए चा पुढील भाग फलाट क्रमांक १ ला जोडावा आणि फक्त कल्याण लोकल एकवरून सोडाव्यात. दोन फलाटांमध्ये टाकण्यात आलेले लोखंडी फेंसिंग काढून टाकावे. यामुळे कल्याण लोकलनी आलेल्या प्रवाशांना दोन्ही बाजूस उतरून रिक्षा स्टँड दिशेने बाहेर जाता येईल. फलाट क्रमांक दोन/तीनचा उपयोग कसारा/कर्जत- मुंबई लोकल गाडय़ांसाठी करावा. प्रवासी संघ यासाठी पाठपुरावा करेल काय?

सॅटीसवरील फेरीवाल्यांचा विळखा कायम

सुयश पेठे, कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने कल्याण शहरातील रस्ते, पदपथ मोकळे करण्यासाठी सध्या धडाकेबाज मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये महापालिकेच्या आयुक्तांना त्यांचे सहकारी सहकार्य करीत नसल्याचे समजते. कारण एकीकडे शहरातील रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचे बस्तान कायम राहिल्याचे आढळून येत आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ, स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी डल्ला मारला आहे. दररोज वाहतूक पोलीस आणि खाकी वर्दीतील पोलीस त्यांच्या गाडी आणि अन्य लवाजम्यासहित शिटय़ा मारत फेरीवाल्यांकडून दंड वसुली करत असतात. परंतु कोणताही पोलीस अधिकारी रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर, पदपथांवर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्याची तसदी घेत नाही. यासंबंधी पोलिसांना विचारणा केली असता, हे काम महापालिकेचे आहे असे उत्तर मिळते. महापालिकेचे कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात दिसतात खरे, परंतु काम काय करतात याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. स्थानक परिसरात झालेली वाहतूक कोंडी तातडीने सोडविणे गरजेचे आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात छोटी पोलीस चौकी उभारून या परिसरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांचे आकार लहान केले पाहिजेत.

वाहतूक कोंडीचे ‘डोंबिवली’

राजेंद्र घाडीगावकर, डोंबिवली

कल्याण-डोंबिवली महापालिकेने रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामास पुन्हा सुरुवात केली आहे. रस्त्यांच्या कामांना सुरुवात करताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी पालिका तसेच शहर वाहतूक शाखेने घ्यावयास हवी असे वाटते. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असते त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाते. परंतु त्याच्या पुढील चौकात या एकेरी वाहतुकीमुळे प्रचंड कोंडी होताना दिसते. सध्या डोंबिवलीतील चार रस्ता, केळकर रोड, टंडन रोड, ठाकुर हॉल रोड, शहराला पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल आदी परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. स्टेशन परिसरातील मध्यवर्ती शाखेसमोरील रस्त्याचे काम सध्या सुरू असून या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी केलेली असतात तर दुसरीकडे फेरीवाल्यांची गर्दी पाहावयास मिळते. या दुतर्फा गर्दीतून प्रवाशांना आपली वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

रामनगर परिसरात वृंदावन हॉटेलसमोरील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरात सायंकाळी चार वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजाविताना दिसत आहेत. परंतु दुचाकी स्वरांच्या आडमुठेपणामुळे या कोंडीत अधिक भर पडते. रामनगर परिसरात सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी जाण्यासाठीच्या बस उभ्या राहतात. याच ठिकाणी भर रस्त्यात रिक्षा थांबा असल्याने अन्य वाहनांना रस्त्यातून मार्गक्रमण करणे अवघड जाते. शहरातील कामांना सुरुवात करण्याअगोदर वाहतूक शाखेने कमी वर्दळीच्या ठिकाणाहून वाहने हलविणे गरजेचे आहे. संबंधित रस्त्यांवर काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळविण्यात आल्याचे फलक लावायला हवेत.