सध्या ठाणे स्टेशन परिसरात रोज सुमारे आठ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीसुद्धा येथे गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. स्टेशन परिसराचा विकास करण्याचा दावा जरी पालिका करीत असली तरी आधीच पालिकेचा येथील महत्त्वाकांक्षी सॅटीसचा प्रोजेक्ट फसला आहे. आज सॅटीसवर एक बस जरी बंद पडली तरी, जांभळीनाक्यापर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होते.

खालच्या बाजूला रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्ड असून, फेरीवाल्यांचा गराडा आजही या भागाला आहे. तेथेच एसटी स्टॅण्डही बाजूलाच आहे. संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी, वाहनांच्या आवाजांनी आणि प्रदूषणामुळे गजबजलेला असतो. स्मार्ट सिटीचे नियोजन प्रत्यक्षात येणार का, ठाणेकरांनी अशा निष्कामी पुढाऱ्यांना का निवडून द्यावे असा प्रश्न पडतो..

राजकुमार खोत, ठाणे</strong>

कमी प्रसिद्ध स्थळांना प्रसिद्धी द्यावी

आपल्या ‘लोकसत्ता ठाणे’मधील ‘सहजसफर’ स्तंभातील ‘मनमोहक ठाणे खाडी’ हा लेख वाचनात आला. ठाणे शहरातील या आणि अशा अनेक छोटय़ा छोटय़ा कमी प्रसिद्ध ठिकाणांना ‘लोकसत्ता ठाणे’ यांनी अशीच सतत प्रसिद्धी देत राहावी. ज्यायोगे सामान्य नागरिकांचे अशा ठिकाणांकडे लक्ष तर जाईल. तेथील वर्दळ वाढेल आणि त्यामुळे प्रशासनास तेथे विविध अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच संदीप नलावडे यांची लेखनशैली आवडली. त्यांनी असेच लेखन सतत करावे.

विघ्नेश खळे, ठाणे

कळव्याला दुजाभाव का?

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाण्याचे नियोजन करून पाणी वापरले पाहिजे. ठाणे शहरात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा होत नाही. मात्र कळव्यात आठवडय़ातून दोन दिवसच पाणी मिळते. या प्रकाराला पाण्याचे नियोजन म्हणायचे का? पाणीपुरवठा करणारे असा दुजाभाव का करीत आहेत? यात राजकीय वाद असल्याने कळव्यात पाणी कमी असल्याच संशय कानावर येत आहे.  काही भागांत पाणीकपात तर काही भागांत मुबलक पाणी हा कोणता न्याय? पालिकेने पुरेसे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.  विवेक तवटे, कळवा

कचऱ्याच्या ढीगाचा त्रास

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचे बस स्थानक गावदेवी परिसरात आहे. दिवसेंदिवस गावदेवी बसस्थानकाच्यासमोर कचऱ्याच्या ढीगाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बस स्थानकाच्या समोरच कचरा टाकला जातो. मोठय़ा प्रमाणात हा कचरा साचत असल्याने त्या ठिकाणी प्रचंड दरुगधी पसरते. परिसरातून जाताना नाकाला रुमाल लावावा लागतो. इतक्या मोठय़ा प्रमाणात कचरा साचूनही या कचऱ्याची कोणत्याही प्रकारे विल्हेवाट केली जात नाही हे खेदजनक आहे. याच कचरा कुंडीच्या बाजूला खासगी सोसायटी उभी राहिली आहे. तसेच व्यावसायिकांची बांधकामे सुरू झाली आहेत. महानगरपालिकेची वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र तरीही कचरा या परिसरातून हटवला जात नाही. या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गावदेवी बस स्थानकाच्या रांगेत प्रवासी कचऱ्याचा दर्प सहन करत उभे असतात. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात विशेष लक्ष देऊन या भागातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. कचऱ्याची दरुगधी आणि घाणीच्या साम्राज्यातून सुटका करणे या परिसरातील नागरिकांची गरज बनली आहे.

विजय वागळे, ठाणे

शेअर रिक्षांचे फलक लावा

ठाण्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षांची सोय केलेली आहे. त्यामुळे माफक भाडय़ांत, झटपट प्रवास करणे सोयीचे जाते. मात्र या विविध ठिकाणच्या रिक्षा नेमक्या कोठून सुटतात ते कुणीच सांगत नाही. त्यासाठी प्रशासनाने कोणत्या रिक्षा कोठून सुटतात, त्या ठिकाणी जाण्यासाठी किती भाडे आकारण्यात येते आदी गोष्टी दर्शविणारे फलक ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लावावे. तसेच प्रत्येक रिक्षा स्टॅण्डवर त्या ठिकाणचे नाव व भाडे लिहिलेले फलक लावावे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून ही योजना प्रशासनाने लवकर अमलात आणावी.

अविनाश माळी, ठाणे.

पाणी बचत आणि वाटप..

ठाण्यात बुधवारी पाणी नाही, हे शहरवासीयांना समजले. ३०% पाणी बचतीसाठी मंगळवारी रात्री ९.३० वाजता बंद केलेले पाणी गुरुवारी सकाळी ७ वाजता न येता सायंकाळी ७ वाजता येते. साधारण ४४/४५ तासांचा खंड यामुळे पडतो. त्याऐवजी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस किंवा संपूर्ण आठवडा फक्त एकच वेळेस पाणी सोडल्यास तीसऐवजी पन्नास टक्के  पाणी बचत होऊ शकेल

एम. के. जोशी, ठाणे (प.)