अप्रतिम सुशोभीकरण आणि दृष्ट लागावा असा जॉगिंग ट्रॅक त्यामुळे काळातलावावरील गर्दी सकाळ, संध्याकाळ वाढत आहे. ट्रॅकवरील ध्वनिक्षेपक यंत्रणेवरून सुंदर गाण्यांसह दर्शकांना काही सूचनाही केल्या जातात. त्यात पाण्यातील माशांना पाव खायला घालण्यास सक्त मनाई आहे, अशी सूचना वारंवार केली जाते. नागरिक मोठय़ा प्रमाणात हे कृत्य करीत असून लहान मुलांनाही त्याचे अनुकरण करायला लावत असतात. पाण्यात टाकण्यात आलेले पावाचे तुकडे केवळ माशेच नव्हे तर पाहुणे म्हणून आलेले पक्षीसुद्धा हे तुकडे खातात. त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. पाव हा पदार्थ जलचरांसाठी आयोग्य आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. काही जण केवळ धार्मिक कृती म्हणून पावाच्या लाद्याच्या लाद्या तलावामध्ये तुकडे करून फेकत असतात. महापालिका त्यांना ध्वनिक्षेपकावरून माशांना पाव टाकू नये असे सुचवत असते. पाण्यात टाकलेले पाव तसेच पडून तरंगत राहतात. ते खराब झाल्याने पाण्याला दरुगधी येत असते. त्यामुळे काळातलावाचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. सध्या हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी किमान शोभा देण्यासाठी महत्त्वाचे असून नागरिकांनी ते सौंदर्य कायम राखावे.

– वसंत कल्हापुरे

साध्या पद्धतीने लग्नसोहळे व्हावे

स्वरांगी मराठी यांनी लग्नाचा खर्च कमी करुन तो निधी संस्थांना दान केला याविषयीचे वृत्त वाचले. ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे, हाच आदर्श समाजातील इतर लोकांनीही घ्यावा. लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची घटना आहे हे मान्य, परंतू तो दिवस आनंदाने साजरा करण्याचे अनेक पर्याय असू शकतात. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची काही एक गरज नाही. मुळात नव्या पिढीनेच ही गोष्ट लक्षात घेतली पाहीजे, आणि आई वडिलांना समजावून दिली पाहीजे. लग्नात खर्च होणारा पैसा पुढे तुम्हालाच इतर कामासाठी उपयोगी पडेल. तो काही कोणता कार्यक्रम नाही की त्यात ऐवढा डामडौल करावा. लग्न म्हणजे दोन परिवारांचे मिलन आणि आनंदाचा सोहळा तो साध्या सुध्या पद्धतीने साजरा करा.

– स्वानंद वैद्य, डोंबिवली

दुर्लक्षित ऐतिहासिक ठाणे स्थानक

१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदरवरून निघालेली पहिली रेल्वे ठाणे स्थानकात विसावली. या घटनेली तब्बल १६३ वर्षे पूर्ण झाली. इतिहासाचा विचार केल्यास ठाणे हे आशिया खंडातील पहिले रेल्वे टर्मिनस आहे. अशा या ऐतिहासिक ठाणे स्थानकाचा १६३ वर्षांत काहीच विकास झाला नाही. याउलट नवी मुंबईच्या काही स्थानकांची निर्मिती अलीकडे झाली. तसेच विकाससुद्धा झाला. वाशी, नेरुळ, जुईनगर, सानपाडा या ठिकाणची रेल्वे स्थानके ठाणे स्थानकापेक्षा अतिशय सुनियोजित आहेत. पार्किंगची योग्य सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र ठाणे रेल्वे स्थानकाची दुरवस्था पाहता फेरीवाले, पार्किंगची अयोग्य सुविधा यामुळे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी, अस्वच्छता पाहायला मिळते. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहिल्यास ठाणे स्थानकाचे स्वरूप बदलू शकेल. अन्यथा २०५३ साली रेल्वेचा द्विशतक महोत्सव साजरा होईल, तरीही ठाणे रेल्वे स्थानक दुर्लक्षित राहील यात शंका नाही.

– दिलीप गडकरी, कर्जत

तिकीट न काढता फुकट प्रवास करावा!

गेली अनेक वर्षे  ठाणे- कर्जत-कसारा शटल वाढविणे, गाडी व फलाटामधील पोकळी भरणे, रेल्वेचे पुल रुंद करणे, कोपरी स्टेशन उभारणे इत्यादी जीवनाश्यक मागण्यासंदर्भात रेल्वेकडून वेगाने कामे होत नसल्याने आता सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी एकत्रितपणे सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ठाणे ते कर्जत-कसारा येथील प्रवाशांनी तिकीट वा पास न काढता फुकट प्रवास करावा, असे आवाहन करावे. कारण डोंबिवलीकरांच्या मूक आक्रोशाऐवजी हा फुकट आक्रोश परिणामकारक ठरू शकेल असे वाटते.

– प्रदीप करमरकर, ठाणे

‘लोकसत्ता ठाणे’तील ‘वाचक वार्ताहर’ तसेच ‘लोकमानस’ या सदरांतून आपणही आपल्या परिसरातील नागरी प्रश्न, समस्या, तसेच विविध घडामोडींवर मते मांडू शकता.

आमचा पत्ता

लोकसत्ता ठाणे कार्यालय,

कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाड, ठाणे (पश्चिम), ४००६०२

ई-मेल : lsthane2016@gmail.com

दू. क्र. २५३८५१३२,फॅक्स झ्र् २५४५२९४२