ठाण्यात उद्या ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’; संजीव जयस्वाल, गोविंद बोडके यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिमुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत बांधकाम क्षेत्राला मोठा वाव असला तरी एकूणच या क्षेत्राला भेडसावणारी आव्हाने मोठी आहेत. या शहरांमध्ये सुरू असलेली परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह पुनर्विकास अशा महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये शासनासोबत बांधकाम उद्योगाचाही वाटा महत्त्वाचा असणार आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित अशा विविध प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी शुक्रवार, ३० ऑगस्टला ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे ठाण्यात आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल. या कार्यक्रमात केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो, उड्डाणपूल, रस्त्यांचे विस्तीर्ण असे जाळे विणण्याचे प्रकल्प आखले जात असून येथील बांधकाम क्षेत्राला त्यामुळे उभारी मिळेल असा प्रयत्न आहे. ठाणे, डोंबिवलीसारख्या शहरांलगत नव्या औद्योगिक वसाहतींची आखणी करण्यासोबत नव्या आणि नियोजनबद्ध अशा शहरांची उभारणी करण्याचे विचारही बोलून दाखविले जात आहेत. एकीकडे या नागरीकरणाला योग्य दिशा मिळावी असे प्रयत्न होत असले तरी पायाभूत सुविधांच्या आघाडीवर गेल्या अनेक वर्षांपासून केले गेलेले दुर्लक्ष, जागोजागी उभी राहिलेली बेकायदा बांधकामे आणि त्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्नही येथील बांधकाम उद्योगाला अधूनमधून सतावत आहेत. मुंबई, ठाण्याच्या वेशीवर दररोज होणारी वाहतूक कोंडी, कल्याण- डोंबिवली- ठाणे- मुंबईदरम्यान प्रवासासाठी असलेली मर्यादित साधने, पुरेशा नियोजनाअभावी काही शहरांपुढे उभी राहिलेली पाणीटंचाई तर काही भागांत नित्यनेमाने येणारे पूर यांसारखी मानवनिर्मित संकटे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान येथील नियोजन प्राधिकरणांपुढे आहे. त्यामुळे या शहरांमधील बांधकाम व्यवसायाला या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

आव्हानांची मोठी यादी या उद्योगापुढे असली तरी विस्तीर्ण अशी मोकळी जमीन, मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरांचा पर्याय, नव्या विकास प्रकल्पांची होत असलेली पेरणी यामुळे या व्यवसायाला वाढीची मोठी संधीही या भागात आहे. या आणि अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा या कॉन्क्लेव्हमध्ये होणार आहे. प्रतिमुंबईचा विकास आणि परवडणाऱ्या घरांची उभारणी, समूह विकास योजना यांसारख्या विषयांनाही यानिमित्ताने हात घातला जाणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे नरेड्को हे इंडस्ट्री पार्टनर असून होरायझन हॉस्पिटल हे हेल्थकेअर पार्टनर आहेत. तर रिजन्सी ग्रुप, जेव्हीएम स्पेसेस, रोसा ओअ‍ॅसिस आणि मोहन ग्रुप हे इव्हेन्ट पार्टनर आहेत.