ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील भोरपावन पार्क येथील चंद्रभागा इमारतीमध्ये राहणाऱ्या अमोध जोशी (२३) या तरुणाच्या दुचाकीला वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक पळून गेला. सोमवारी सकाळी मुंब्रा बायपास रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत डिझेल चोर अटकेत

भिवंडी : कल्याणनाका येथील साखरादेवी मंदिरासमोरील पार्किंगच्या जागेत चोरटय़ा डिझेलने भरलेला ट्रक भिवंडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक रतनलाल जैसवाल (४०), कामगार जलालउद्दीन खान (४९), गोपी लखा (४०), हमाल सुनील तिवारी (२८), राजनाथ गौड व आरमान अशा सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख रुपये किंमतीचा टँकर, त्यामध्ये १९ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सुमारे १७ हजार ५०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. ही टोळी या ट्रॅंकरमध्ये डिझेल साठवून त्यातून त्याची विक्री करत होते. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी

डोंबिवली : शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रमोद मोहिते यांच्या कार्यालयात चोरटय़ांनी प्रवेश करून तेथून रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मोहिते यांच्या एमआयडीसी येथील रहिवासी परिसरातील रजनीगंधा सोसायटीच्या तळमजल्याच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील कपाट तोडून त्यातील सुमारे १ लाख १८ हजाराची रक्कम लंपास केली. त्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांची कागदपत्रे, भागप्रमाणपत्र, गुंतवणुकांची कागदपत्रे चोरटय़ांनी चोरून नेली. मानपाडा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

सोनसाखळी चोरी

विठ्ठलवाडी : पारिजात कॉलनी मीनाक्षी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय महिला मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. त्यावेळी उल्हानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारळाने भरलेला ट्रक जाळला

ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील रस्ता क्रमांक ३३ च्या बाजूला वाहन चालक मंजय गौडा (३५) यांच्या मालकीचा नारळाने भरलेला ट्रक उभा होता. सोमवारी रात्री साडे तीनच्या सुमारास या ट्रकला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या आगीमध्ये ट्रकचे व त्यातील नारळांचे असे सुमारे १५ लाख २७ हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी वागळे पोलीसात गुन्हा दाखल झाला.