अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार; त्रिकुटाला अटक, अन्य दोघांचा शोध सुरू

फेसबुकच्या माध्यमातून भिवंडीतील एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिला मुंबई दाखविण्याचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कारात अडकविल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक झाली आहे. सानिया ऊर्फ शैलेदाबानो शेख (वय २४)  असे या महिलेचे नाव असून अश्फाक निसार अहमद शेख (३१) आणि  इर्शाद अन्सारी (२३) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. अश्फाक हा सानियाचा भाऊ असून सानियाच्या मदतीने पैशाच्या मोबदल्यात या मुलीवर बलात्कार केलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

भिवंडी येथील पिराणी पाडा परिसरात पीडित १५ वर्षीय मुलगी राहते.

मुंबईत राहाणाऱ्या सानिया हिने फेसबुकच्या माध्यमातून तिच्याशी मैत्री केली. यातून १७ ऑगस्टला सानिया तिला भेटण्यासाठी भिवंडी परिसरात आली होती. त्यावेळी तिने मुंबईला फिरायला जाण्याचा बहाणा करत तिला रिक्षातून मुंबईला नेले. त्यानंतर अंधेरी परिसरातील एका खोलीत तिला कोंडून ठेवले. या खोलीत अश्फाक आणि इर्शाद या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सानिया हिने दोघांकडून पैसे घेऊन तिला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या लॉजवर पाठविले. या दोघांसोबत जाण्यास नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यासोबत लॉजवर पाठविण्यात आले. या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर तिला पुन्हा एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. अखेर तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला.

कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिने तेथील पोलीस ठाणे गाठले आणि त्यांच्या मदतीने गेल्या शुक्रवारी ती घरी पोहोचली. घडलेला सर्व प्रकार तिने सांगितल्यानंतर मंगळवारी तिच्या कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

एकतर्फी प्रेमातून छळणाऱ्यास अटक

ठाणे : एका मैत्रिणीच्या ओळखीतून त्याने तिच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर तिच्याकडे प्रेमास होकार मिळावा म्हणून तगादा लावला. पण, तिने नकार दिल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे ती खचली. अखेर तिने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पाचपखाडीतील कार्यालयात धाव घेतली. त्याच वेळी तिथे आलेल्या त्या तरुणाला आव्हाडांनी जाब विचारताच त्या तरुणीला हिम्मत आली आणि तिने सर्वादेखतच त्या तरुणाला चोप दिला. सोमवारी रात्री ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.

ठाणे येथील पोखरण रोड परिसरात पीडित १७ वर्षीय मुलगी राहत असून ती ठाण्यातील एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. एका मैत्रिणीच्या ओळखीतून प्रतीक पाटील याच्यासोबत तिची ओळख झाली. याच ओळखीतून पुढे त्यांच्यात मैत्री झाली. यातूनच त्याने तिच्यापुढे प्रेमप्रस्ताव ठेवला. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून तो तिचा पाठलाग करीत होता. तसेच तिला प्रेमास होकार देण्यास आग्रह धरत होता. काही महिन्यांपूर्वी तिच्या मित्र-मैत्रिणीचा ग्रुप फिरायला गेला होता. त्यात प्रतीक आणि पीडित तरुणीसुद्धा होती. तिथे ग्रुपसोबत तिने छायाचित्रे काढली होती. या फोटोचा गैरवापर करण्याची धमकीही तिला देत होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे पीडित मुलगी पूर्णपणे खचली होती. अखेर तिने आमदार आव्हाड यांच्या पाचपखाडीतील कार्यालयात धाव घेतली. तिथे त्या तरुणाला बोलाविण्यात आले. या तरुणाने तिथेही हाणामारीचा प्रकार केला. त्याचवेळी तिथे आमदार आव्हाड आले आणि त्या तरुणाला जाब विचारला. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून मानसिक त्रासामुळे खचलेल्या त्या तरुणीचा संयम सुटला आणि तिने त्या तरुणाला बेदम चोप देत संपूर्ण संताप व्यक्त केला. या घटनेनंतर त्या तरुणाला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तरुणीला धमक्या

माझा भाऊ पोलीस उपनिरीक्षक आणि बहीण क्लेक्टर आहे. तुझ्या वडिलांना रिक्षात घालून मारेन. तसेच तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला लावेन, अशा धमक्या तो पीडित तरुणीला देत होता. त्यामुळे पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.

 

विवाहाचे आमिष; महिलेला लाखोंचा गंडा

पुणे : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका ज्येष्ठ महिलेला विवाहाचे आमिष दाखवून भामटय़ाने ९४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भामटय़ाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्ले बेन्सन असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामटय़ाचे नाव आहे. मॉडेल कॉलनी भागात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय महिलेने या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सन २०१४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांची विवाहित मुलगी परदेशात स्थायिक झाली आहे. मे महिन्यात बेन्सन नाव सांगणाऱ्या एका भामटय़ाने त्यांना फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठविली. तक्रारदार महिलेने त्याची मैत्रीची विनंती स्वीकारली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांचा संवाद वाढला. बेन्सनने लंडनमध्ये अभियंता असल्याची त्याने बतावणी केली होती.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दोघांचा संपर्क  वाढल्यानंतर त्याने महिलेला विवाहाचा प्रस्ताव पाठविला. मे महिन्यात बेन्सनने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) बॅग पकडली आहे.

कस्टमकडून बॅग घेण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील. बॅगेत हिरेजडित दागिने, सोन्याचे दागिने आणि ९५ हजार ब्रिटिश पौंड आहेत, असे बेन्सनने महिलेला सांगितले. महिलेला तातडीने पैसे भरण्याची सूचना त्याने दिली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करून त्याने जवळपास ५० बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. जुलै महिन्यापर्यंत महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांवर ९४ लाख रुपये भरले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

 

मुलीची छेड काढणाऱ्याचा त्रास; शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जत  : कोपर्डी प्रकरणाने नगरमधील कर्जत तालुका राज्यभरात गाजत असतानाच एका शेतकरी पित्याने मुलीची छेड काढणाऱ्याच्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्यातीलच असलेल्या मुलाने मुलीची छेड काढली, त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार करूनही त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी या आत्महत्येला मुलीची छेडछाड हेच कारण आहे किंवा कसे याबाबत ठोस माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

बाभुळगाव खलसा येथे एक ४०वर्षीय शेतकरी कुटुंबियांसमवेत राहात होता. या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी तो मरण पावला. जवळचा नातेवाईक असलेल्या मुलाकडून पोटच्या मुलीची छेड काढली जात असल्याच्या कारणावरून संबंधित शेतकऱ्याने विषप्राशन केल्याचे समजते. केतन लाढाणे या तरुणाने २१ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्याच्या घरात घुसून त्याच्या मुलीला ‘तू मला आवडतेस, तुझे यावर काय म्हणणे आहे सांग’, असे सांगत तिला दरडावले. परंतु मुलीने आरडाओरड केल्याने केतन पळून गेला. नंतर मुलीने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. मुलीच्या भावाने केतनला जाब विचारला असता त्याने त्यालाच धमकावले. अखेरीस मुलीच्या भावाने मिरजगाव पोलीस ठाण्यात केतनविरोधात फिर्याद दाखल केली. तरीही केतन संबंधित मुलीला त्रास देतच होता.