मासुंदा तलाव

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र येथील तलावांकडे महापालिका सातत्याने दुर्लक्ष करत असून ठाणे शहराचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मासुंदा तलावाच्या पाण्याचा दरुगध येतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथे वावरणाऱ्या लोकांमुळे या तलावाची वाईट अवस्था झाली आहे.

तेथे उभ्या असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे येथे कचरा होत असल्याने येथील फेरीवाल्यांना महापालिकेने र्निबध लादणे गरजेचे आहे. तसेच कचरा, कागद तलावात फेकणाऱ्यांसाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरा

बसवावा आणि कचरा फेकणाऱ्र्याकडून कर वसूल करावा जेणेकरून हा कचरा टाळता येईल. येथे जाहिरातींचेही बरेच फलक लावलेले दिसतात त्यामुळे सुंदर दिसणाऱ्या ठाण्याला जाहिरातींच्या फलकांमुळे दृष्ट लागली आहे.

– निर्मल कचरे, ठाणे.

रस्ता नक्की कोणासाठी?

डोंबिवली- येथील आयरे गाव येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारी वाळू, सिमेंटचे ट्रक हे इमारतीच्या आवारात पुरेशी जागा नसल्याने  चक्क रस्त्यावर खाली केले जात आहेत. आयरे गावात जाणारा हा रस्ता अगोदरच अरुंद असून बांधकाम साहित्याने तो अर्धा अडविला जात आहे. संध्याकाळी या ठिकाणी यामुळे वाहनांची मोठी गर्दी होते. मोठे अवजड वाहन आल्यास तर पूर्ण रस्ताच बंद होतो.

हे साहित्य रस्त्यावर टाकले जाऊ नये यासाठी या इमारत बांधकाम व्यावसायिकाला काही सूचना लोकप्रतिनिधींनी दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु लोकप्रतिनिधींना याचे काही पडलेले नाही असेच दिसते. कारण गेले कित्येक दिवस या इमारतीचे काम सुरू असून दररोज वाहतूक कोंडीची परिस्थिती येथे उद्भवते. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांकडे थोडे गांभीर्याने पहावे.

– अपर्णा पाटणकर, डोंबिवली.

रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा बसेल का?

रिक्षाचालकांच्या मनमानी वृत्तीचे दर्शन घडविणारी मालिका लोकसत्ता ठाणेने सुरू केली आहे. अडवणुकीचे थांबे या नावे सुरू केलेली ही मालिका नक्कीच उल्लेखनीय आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी असे अडवणुकीचे थांबे असून या रिक्षाचालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहर वाहतूक विभागाने काही नियम घालून, त्यांना विशिष्ट ठिकाणी थांब्यासाठी जागा दिल्या पाहिजेत. चालकांना हवे तिथे रिक्षा थांबा सुरू केल्याचे चित्र डोंबिवलीसारख्या शहरात दिसते.

ग्राहकांची सबब पुढे करून हे केले जाते. परंतु जर सोसायटीच्या दारात रिक्षा उभी केली नाही तर थांब्याजवळ प्रवासी जाणारच आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीची सबब पुढे करून जे

रिक्षाचालक हवे तेथे थांबूाा तयार करत आहेत त्यांना आळा घातला गेला पाहिजे. शहर वाहतूक विभागाने कठोर कारवाई केली आणि त्या कारवाईत सातत्य ठेवले तर नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

– लता सावंत, डोंबिवली.

लोकसत्ता ठाणेकर व्हा!

‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वाचकांनाही सहभाग घेता येणार असून त्यांच्यासाठी ‘वाचक वार्ताहर’, लोकमानस अशी विविध सदरे सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून वाचकांना त्यांची मते, सूचना आणि तक्रारी मांडता येणार आहेत. वाचक वार्ताहर या सदरामध्ये वाचकांनी आपल्या परिसरातील समस्यांची माहिती आणि फोटो पाठवणे गरजेचे आहे. तसेच लोकमानस या सदरामध्ये वाचकांनी ‘लोकसत्ता ठाणे’तील बातम्यांविषयी आपली मते, नागरी समस्या आणि सूचना मांडता येऊ शकतील. याशिवाय दैनंदिनी, संक्षिप्त या माध्यमातून आपल्या मान्यवर संस्थेच्या कार्यक्रमांना पूर्वप्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता- लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम), ४००६०२.

ई-मेल – lsthane2016@gmail.com

दूरध्वनी क्रमांक- २५३८५१३२,

फॅक्स- २५४५२९४२.