प्रवाशांच्या सोयीसाठी अस्तित्वात आलेली बेस्ट हळूहळू वाहक, चालक आणि व्यवस्थापन यांच्याच फायद्याचा विचार करू लागली. पेलवणार नाही एवढा वेतनावरील खर्चाचा भार आणि दिवसेंदिवस खालावत जाणारा सेवेचा दर्जा यामुळे प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. त्याच वेळी आरटीओ अधिकारी, प्रवासी आणि रिक्षाचालक या सर्वाच्याच फायद्याची शेअर रिक्षाची पर्यायी व्यवस्था उपनगरांत आकार घेऊ लागली. भरीत भर म्हणून मेट्रो प्रवाशांना खुणावू लागली. या सगळय़ा घडामोडींत बेस्टला घरघर लागली आहे. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. खासगीकरण करा किंवा आणखी काही करा, बेस्टला झालेला हा असाध्य रोग बरा होण्यापलीकडे गेला आहे. त्या रोगाचे नाव सांगायलाच पाहिजे का ‘राव’?

– गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर पश्चिम, मुंबई</strong>

 

भास्कर कॉलनी परिसरात कुत्र्यांचा उच्छाद

ठाण्यातील भास्कर कॉलनी परिसरात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आपण नक्की माणसांच्या वस्तीत राहतो की कुत्र्यांच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील गल्लीच्या सुरुवातीलाच भटके कुत्रे नागरिकांच्या स्वागतासाठी उभे असतात. घरी येणारे पाहुणे, मित्र-मंडळी यांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही या सगळ्याचा त्रास होत आहे.

भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावल्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत. भास्कर कॉलनी परिसरातील ही भयावह स्थिती कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. भास्कर कॉलनी परिसरातील अश्वमेध, मानस सोसायटी येथे या कुत्र्यांचा जमाव पाहायला मिळतो. कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून, कुत्र्यांना घाबरून तर काही मंडळी किळस म्हणून या परिसरातून ये-जा करणे टाळतात.

राम मोघे, ठाणे</strong>

 

घातक दुर्लक्ष

घनकचरा व्यवस्थापन हे यापुढील काळात पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सुदैवाने ठाणे महानगरपालिकेने ओला व सुका कचरा वेगळा गोळा करणे सुरू केले होते, मात्र नागरिकांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल न घेता ओला आणि सुका कचरा एकत्रच टाकणे सुरू ठेवले आहे. पर्यावरण रक्षण हे एकटय़ा सरकारचे काम नाही. सुनियोजित शहराच्या सरकारी निर्णयात कोणत्या स्तरावर ‘खो’ घातला जातो हे शोधून दंड करणे आणि त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हे काम व्हायला हवे.

– अनुजा गांगल, ठाणे

 

‘टोइंग’वाल्यांच्या मनमानीचा बळी

‘वाहनजप्तीच्या धास्तीने धावताना एकाचा मृत्यू’ हे वृत्त (लोकसत्ता ९ जून) वाचले आणि एक जीव हकनाक गेल्याने वाईट वाटले. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सम-विषम तारखांनुसार रस्त्याच्या बाजूला पार्किंगची सुविधा पुरवण्यात आली आहे. काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ही असते. तरीही या ठिकाणी नियमभंग करून गाडय़ा उभ्या केल्या जातात. काही वेळेस मात्र अनवधानाने अशा ठिकाणी गाडय़ा लावल्या जातात. खरे तर नियमबाहय़ पद्धतीने उभ्या केलेल्या गाडय़ा टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेऊन किंवा जॅमर लावून वाहनचालकांना बेशिस्तपणाबद्दल दंड आकारणे हे वाहतूक पोलिसांचे मुख्य काम; परंतु टोइंग व्हॅनवर तैनात असलेले कंत्राटी कामगार मात्र मनमानी करताना दिसतात. हे कामगार (मुख्यत्वे मुले) दुचाकी बेदरकारपणे उचलतात. त्या वेळी दुचाकींची मोडतोड होण्याची भीती असते. चारचाकी गाडय़ा उचलून नेतानाही पुढच्या बाजूचे काही वेळा नुकसान होते. गाडी सोडवण्यासाठी मनमानी दर आकारणे, गाडय़ा चुकीच्या पद्धतीने उचलणे, गाडय़ांचे नुकसान करणे अशा प्रकारांमुळे ‘टोइंग व्हॅन’ची एक प्रकारे दहशतच निर्माण झाली आहे. याच दहशतीमुळे, कामगारांच्या मुजोरीमुळे कल्याणमधील प्रकार घडला आहे.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी