ठाण्यात विभागीय अंतिम फेरी रंगणार

ठाणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवर परखडपणे मते मांडण्यासाठी संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी मंगळवारी रंगणार आहे. प्राथमिक फेरीत यशस्वी ठरलेल्या एकूण सात स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, सामाजिक भान निर्माण व्हावे आणि अभ्यासू, चौकसवृत्ती वाढावी, या उद्देशाने ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.

ठाणे, मुरबाड, वसई, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या उपनगरांतील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी सात स्पर्धक ठाणे विभागीय अंतिम फेरीत पोहोचले आहेत. प्राथमिक फेरीतून ठाणे विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या विद्यार्थी वक्त्यांना वक्तृत्वासाठी विषय देण्यात आले होते. हे विद्यार्थी मंगळवारी आपली मते मांडणार आहेत. मुद्देसूद अभ्यासाला आवेशपूर्ण वक्तृत्वाची जोड देत विभागीय अंतिम फेरीसाठी तयारी करण्यात येत आहे. विभागीय अंतिम फेरीतून एका विद्यार्थी वक्त्याची निवड ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या १७ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी होणार आहे. मुरबाड येथील जेएसएम महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत शिकणारा महेश घावट, ठाण्यातील बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात प्रथम वर्ष सीएसच्या वर्गातील अनिकेत पाळसे, द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा राज खंडागळे, वसई येथील वर्तक महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारा सुप्रीम मस्कर, पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलमध्ये कला शाखेतील ११वीत शिकणारी आम्रपाली सहजराव, जोशी बेडेकर महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकणारी किमया तेंडुलकर, मुंबई विद्यापीठ-ठाणे उपविभागाच्या तृतीय वर्ष विधि शाखेची अनुजा परुळेकर यांच्यात स्पर्धा होणार असून यापैकी एका स्पर्धकाची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे.

प्रायोजक

पितांबरी कंठवटी प्रस्तुत, लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

कधी?

पहिला मजला, सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प.)

कुठे?

मंगळवार, १२ मार्च,

सायंकाळी ६ वाजता