ठाणे स्थानक परिसरात रिक्षा मिळवण्यासाठी प्रवाशांची तासभर प्रतीक्षा

ठाणे रेल्वे स्थानकातून शहरातील वेगवेगळ्या भागांत जाण्यासाठी प्रवाशांना शेअर थांब्यावर रिक्षा मिळवण्यासाठी सुमारे एक ते दीड तासांची वाट पाहावी लागत आहे. शेअर रिक्षा थांब्यांवर रिक्षाच येत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला असून यामुळे या थांब्यावर ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या परिसरात प्रवाशांच्या लांबलचक रांगांच्या ‘रांगोळय़ा’ पाहायला मिळत आहेत.

ठाण्यातील बी-केबिन परिसर, गावदेवी आणि गोखले रस्त्यावरील विविध ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळू लागला असून त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. ठाणे स्थानकातील बी-केबिन परिसर, गावदेवी आणि गोखले रस्त्यांवरून वागळे-इस्टेट, सोळा नंबर, लोकमान्य नगर, वसंत विहार, कळवा, तीनहात नाका, नितीन कंपनी चौक या परिसरांतील थांब्यांवरून विविध भागांमध्ये शेअर रिक्षा धावतात. कमी पैशांत प्रवास होत असल्याने शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रिक्षा थांब्यांवरील रिक्षांची संख्या कमी होऊ लागली असून प्रवाशांची संख्या मात्र वाढू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी रांग लावणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळवण्यासाठी तासभर वाट पाहावी लागत आहे.

मुंबईत कामाला जाणारी व्यक्ती अर्धा तासात सीएसटीवरून ठाण्यात पोहोचते. मात्र त्याला घरी जाण्यासाठी रिक्षाची तासभर वाट पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेअर रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल होत असताना वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि रिक्षाचालकांकडूनही लक्ष दिले जात नसल्याचा सूर व्यक्त केला जात आहे.

ठाण्यात शेअर रिक्षा थांब्यासाठी रिक्षाचालक प्रयत्न करतात. मात्र त्यानंतर त्या थांब्याकडे दुर्लक्ष करून हे रिक्षाचालक लांबच्या भाडय़ांच्या मागे धावतात. त्यामुळे प्रवाशांना व्यवस्थित सेवा दिली जात नाही. 

– प्राजक्ता उतेकर, प्रवासी

रिक्षाचालकांच्या संघटनांच्या मागणीनुसार शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शेअर रिक्षा थांबे उपलब्ध करून देण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केले जाते. मात्र त्यावर थांब्यावरील संघटनेचे सदस्य रिक्षाचालक थांबत नसेल तर चुकीचे आहे. रिक्षा थांब्याची मागणी केलेल्या रिक्षाचालकांनी पुढाकार घेऊन सेवा देण्याची गरज आहे.

– हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी