स्वयंचलित तिकीट यंत्रणांमध्ये वारंवार बिघाड; ठाणे ते बदलापूरदरम्यानचे प्रवासी हैराण

आशीष धनगर/ मानसी जोशी

ठाणे : उपनगरीय रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर होणारी वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित तिकीट यंत्रणांची सुविधा सुरू केली. मात्र ठाणे ते बदलापूरदरम्यानच्या स्थानकांमध्ये ठेवण्यात आलेली बहुतांश तिकीट यंत्रे सातत्याने नादुरुस्त होत असून त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या स्थानकांत दिवसरात्र तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.

मध्य रेल्वेच्या एका अहवालानुसार ठाणे आणि पलीकडच्या स्थानकांमधून दररोज दहा ते पंधरा लाखांच्या घरात प्रवाशी प्रवास करतात. ठाणे आणि डोंबिवलीसारख्या स्थानकांमधून रेल्वे प्रशासनाला प्रवासी तिकिटांच्या माध्यमातून विक्रमी असे उत्पन्न मिळत असते. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर आणि आसनगाव या भागांत नव्याने गृहसंकुले उभी राहिल्याने येथील रेल्वे स्थानकांतून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढलेल्या प्रवाशी संख्येमुळे रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर मोठी गर्दी होत असल्याने हा भार कमी व्हावा यासाठी एटीव्हीएम, सिओटीव्हीएम आणि एमओव्हीटीएम यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र या यंत्रांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.एटीव्हीएम या यंत्राद्वारे कार्डचा वापर करून तिकीट काढता येते, सिओटीव्हीएम यंत्रात रोख पैसे टाकून तिकीट घेता येते. तर एमओव्हीटीएम यंत्रात यूटीएस अ‍ॅप्लिकेशनवर काढलेल्या तिकिटाची छायांकित प्रत काढता येते. मात्र गेल्या आठवडाभरापासून मध्य रेल्वेवरील ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण आणि बदलापूर या प्रमुख स्थानकांमधील एटीव्हीएम, सिओटीव्हीएम आणि एमओटीव्हीएम यंत्रे बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या यंत्रांमधील सव्‍‌र्हर बंद असणे, यंत्रातील शाई आणि कागदाचा अभाव, यंत्रांनी जुन्या नोटा न स्वीकारणे यांसारखे अडथळे तिकीट काढताना येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

नेहमीचेच दुखणे

ठाणे स्थानकात एकूण पाच एमओटीव्हीएम यंत्रे असून ही पाचही यंत्रे सद्य:स्थितीत बंद आहेत. या स्थानकात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन स्थानिक खासदार राजन विचारे यांनी मध्यंतरी ही यंत्रे बसविण्यासाठी पुढाकार घेतला होता. डोंबिवली स्थानकात एकूण तीन एमओटीव्हीएम यंत्रे असून यापैकी दोन नादुरुस्त असून एकच एमओटीव्हीएम कार्यरत आहे. कल्याण स्थानकात एकूण पाच एमओटीव्हीएम यंत्रे बसवण्यात आली असून ही यंत्रेही धूळ खात पडून आहेत. या यंत्रांविषयी पुरेशा प्रमाणात लोकांमध्ये जागृती नसल्याचेही रेल्वे प्रवाशी संघटनांकडून सांगण्यात आले आहे. कळवा, दिवा आणि बदलापूर रेल्वे स्थानकांतील सिओटीव्हीएम यंत्रे तांत्रिक बिघाड झाल्याने दोन महिन्यांपासून बंद आहेत. दिवा रेल्वे स्थानकातील सिओटीव्हीएम यंत्रणेत बिघाड झाल्याचे स्थानक प्रबंधकांकडून सांगण्यात आले आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकातील सिओटीव्हीएम यंत्राला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाल्याने ही यंत्रणा बंद असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कळवा स्थानकात सुरू असलेल्या बांधकामामुळे सिओटीव्हीएम यंत्रणेत बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. रेल्वे प्रशासन यंत्रांमधील या बिघाडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपी कळवा, दिवा आणि बदलापूर रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

अडचणी काय?

* ‘एटीव्हीएम’ यंत्रांच्या वापरासाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड विकत घ्यावे लागते. त्यामुळे बहुतांश प्रवासी याकडे पाठ फिरवतात.

* ‘सीओटीव्हीएम’ यंत्रात केवळ नव्या कोऱ्या नोटाच स्वीकारण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते.

* ‘एमओटीव्हीएम’ यंत्रातून मोबाइल अ‍ॅपवरून काढलेल्या तिकिटाची छापील प्रत मिळते. मात्र अनेक ठिकाणी ही यंत्रे बंद अवस्थेत आहेत.

एटीव्हीएम, सिओटीव्हीएम आणि एमओटीव्हीएम या यंत्रांच्या वापराबाबत रेल्वेने जनजागृती केली पाहिजे. ही यंत्रे फक्त मेणाच्या पुतळ्यासारखी उभी ठेवू नयेत. या यंत्रांमध्ये बिघाड झाल्यास ती तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे.

राजेश घनघाव, अध्यक्ष कल्याण, कसारा,कर्जत रेल्वे प्रवाशी संघटना

एमओटीव्हीएम यंत्रे कशी हाताळायला हवी याबाबत प्रवाशांना माहिती नसल्याने ही यंत्रे सातत्याने बिघडतात. या एमओटीव्हीएम यंत्राच्या बिघाडाची माहिती घेऊन ही यंत्रे तात्काळ दुरुस्त करण्यात येतील.

– आर. के. मिना, स्थानक प्रबंधक, ठाणे स्थानक