लसीकरण केंद्रांवर रांगा; दुसरी मात्रा न मिळण्याच्या धास्तीमुळे गर्दी

ठाणे : लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने उपाय आखत असले तरी एखाद्या तरी केंद्रावर लस उपलब्ध होईल या आशेने शहरातील जवळपास सर्वच केंद्रांवर नागरिकांच्या लांब रांगा लागत आहे. कोणत्या केंद्रावर किती लशींचा साठा उपलब्ध आहे यासंबंधीची सविस्तर माहिती महापालिका दररोज सायंकाळी पोर्टलद्वारे जाहीर करत असते. तसेच याठिकाणी ‘वॉक इन’ आणि ऑनलाइनद्वारे लशींच्या किती मात्रा उपलब्ध असतील याचेही प्रमाण देण्यास सुरुवात केली आहे. असे असताना थेट जाऊन लसीकरणाचा मार्ग उपलब्ध असल्याने जवळपास प्रत्येक केंद्रांवर नागरिक गर्दी करताना दिसत आहे. ही गर्दी आवरताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत असून दुसरी मात्रा वेळेवर घेता यावी यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून ही गर्दी अधिक होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लशींच्या तुटवडय़ामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने ठाणे शहरात अनेक केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यामुळे नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून केंद्राबाहेर रांगेत उभे राहताना दिसत आहेत. महापालिकेच्या नियोजनानुसार शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर लशींच्या १०० ते १५० मात्रा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा केंद्रांवर पहाटेपासून ४०० ते ५०० नागरिक रांगेत उभे असल्याने वादावादीचे प्रसंग टाळताना महापालिका कर्मचाऱ्यांची दररोज कसरत होत आहे. सहा तास रांगा लावूनही लसीकरण होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महापालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडू लागल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेची लसीकरणाची एकूण २२ केंद्रे बुधवारी सुरू होती. यातील २० लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसरी मात्रा दिली जात होती. या प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० हून कमी लशी उपलब्ध होत्या. यातील अनेक केंद्रांवर ४०० ते ५०० नागरिक लसीकरणासाठी रांगा लावून उभे होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने ज्या नागरिकांनी पहाटे पाच वाजेपासून रांगा लावल्या होत्या. त्यांनाच दुपारी १२ वाजता लस मिळाली. तर सकाळी सहा-सात वाजता येऊनही रांगा लावलेल्या नागरिकांना लस मिळाली नाही. कोलबाड भागात राहणाऱ्या ६७ वर्षीय हर्षदा कदम यांनी सांगितले की, ते आणि त्यांचे पती सकाळी सहा वाजेपासून ठाणे महापालिकेच्या वाडिया

रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी उभे होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या मात्रेची मुदत संपत असल्याने गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. एकाही केंद्रावर वेळेत लस मिळत नाही आणि ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करूनही स्लॉट लगेच भरतात, असा अनुभव कदम दाम्पत्यांनी सांगितला. माजिवडा येथे राहणाऱ्या जयंती सामंत यादेखील अशाच पद्धतीने पहाटे पाच वाजता उठून थेट लसीकरण केंद्रावर आल्या होत्या. सुदैवाने त्यांना १२ वाजता लस मिळाली. लशीसाठी त्यांना सहा तास रांगेत उभे राहावे लागले होते.

विवियाना मॉल येथेही केवळ नोंदणी असलेल्या नागरिकांनाच लस मिळत होती. याठिकाणीही काही नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वच लसीकरण केंद्रावर अशीच परिस्थिती होती. लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लावूनही नागरिकांना सकाळी १०-११ वाजता लस मिळणार नसल्याचे कळविले जाते. हा एकप्रकारे सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे होते.