वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईत प्रवेश करताना लागत असलेल्या दहिसर टोलनाक्यावर प्रतिदिन प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी तयार होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात वेळ वाया जात आहे.

करोनाकाळात रेल्वे वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात काम करण्यास जाणारे नागरिक नाइलाजाने वाहतूक मार्गाचा वापर करत आहेत.

अशा परिस्थितीत दुचाकी, चारचाकी आणि मोठय़ा बसगाडय़ाच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळेदेखील रस्ता अरुंद झाला आहे.त्यामुळे अरुंद रस्ता आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल झाली आहे.

दहिसर टोलनाक्यांजवळ  राज्य शासनाकडून  कोविड केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याकरिता या मार्गावर पोलीस आणि वाहतूक पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. परंतु वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तर प्रति  दिवस तासाभराच्या प्रवासाला २ तास लागत असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

रेल्वे सुरू करण्याची मागणी

साधारण सहा महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे सेवामुळे अनेक नागरिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. तसेच अनेक नागरिक उत्पन्नाचा मोठा वाटा केवळ वाहतूक करण्याकरिता खर्च करत असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता रेल्वे सेवा सुरू करण्याची वेळ आली असून ती लवकरच सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

रेल्वे बंद असल्यामुळे मी गेल्या तीन महिन्यांपासून बसचा वापर करीत आहे. परंतु येथील वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे माझे रोज दोन ते तीन तास वाया जात आहेत. या काळात ऊर्जा आणि पैसा खर्च होत आहे.

-चाणक्य आजगावकर, बस  प्रवासी