कचराभूमीवरील धुराचे लोट एक किमी परिसरात पसरल्याने नागरिकांना त्रास

कल्याण : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीला बुधवारी दुपारी आग लागली. वाऱ्यामुळे ही आग चहुबाजूंनी पसरली आणि काही क्षणात धुराचे लोट अवघ्या कल्याण शहरावर पसरले. कचराभूमीपासून एक किमीच्या परिघात हे धुराचे लोट पसरल्याने येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. आग लागण्याचे नेमके कारणदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कचराभूमीला आग लागल्याच्या घटना सातत्याने घडत असून या आगीच्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असतानाच बुधवारी दुपारी या कचराभूमीला पुन्हा आग लागली. कचऱ्यामुळे आगीने पेट घेतला आणि वाऱ्यासोबत क्षणार्धात सर्वत्र पसरली. आगीच्या धुराचे लोट आधारवाडी, लालचौकी, उंबर्डे, खडकपाडा, शिवाजी चौक, सापाड या परिसरात पसरले होते. या धुरामुळे नागरिक हैराण झाले होते. या धुरापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिकांना तोंड आणि नाकावर रुमाल बांधून दिवस काढावा लागला.

आगीची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. चार अग्निशमन दलाच्या गाडय़ांच्या मदतीने जवानांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र, चारही बाजूंना पसरलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.  जानेवारी महिन्यापासून कडक उन्हामुळे कचरा सुकू लागतो. या कचऱ्यात मिथेन वायू तयार होऊन अनेक वेळा आगी लागतात, तर काही वेळा या भागातील कचरा वेचक कचऱ्यातील लोखंड व इतर धातू मिळविण्यासाठी कचऱ्याला आगी लावतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.