वसईतील घटना; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

वसईच्या एव्हरशाइन सिटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपली प्रेयसी आणि तिच्या १४ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही चाकूचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ते दोघेही ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये राहत होते.

एव्हरशाइन सिटीतीेल साई सेवा इमारतीमध्ये किरण मकवाना (४०) आणि सोनाली चव्हाण (३६) हे दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. किरणने आपल्या पत्नीला सोडले होते, तर सोनाली पतीपासून वेगळी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते एकत्र राहात होते. किरणला पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती, तर सोनालीला पहिल्या पतीपासून कुणाल हा १४ वर्षांचा मुलगा होता. एकत्र राहात असताना तिन्ही मुलांना सांभाळण्याचे ठरले होते, परंतु मुलांना सांभाळण्यावरून त्यांच्यात वाद होता. सोनाली आपल्या मुलांना सांभाळत नाही आणि केवळ कुणालचा सांभाळ करते यावरून किरण संतप्त होता. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास किरणने घरात झोपलेल्या सोनाली आणि कुणालवर हातोडय़ाने वार केले आणि चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केली, त्यानंतर स्वत:च्याही हातावर चाकूने वार करून घेतले. यानंतर पहाटे तीनच्या सुमारास तो तुळिंज पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपल्या कृत्याची कबुली दिली. तो जखमी अवस्थेत असल्याने त्याला सुरुवातीला सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले आणि आता त्याच्यावर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.