भाईंदर : गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे मीरा-भाईंदर शहरात अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतींना, बँकेच्या कामकाजाला बसला.

मीरा-भाईंदर शहरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. मध्यरात्रीनंतर संततधारेचे रूपांतर मुसळधारेत होऊन पहाटेपर्यंत शहरातील विविध भाग पाण्याखाली गेले. मीरा रोड येथील मुन्शी कंपाऊंड, घोडबंदर, हाटकेश, क्वीन पार्क, गावठण आदी भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळच्या वेळी पादचारी गुडघाभर पाण्यातून मार्गक्रमण करताना आढळून येत होते, तर वाहनांचा वेगही मंदावल्याचे दिसत होते.भाईंदर पूर्व-पश्चिमेकडील बेकरी गल्ली, उत्तन, काशीनगर, बीपी रोड येथे नेहमीप्रमाणे पाणी तुंबले. मात्र महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, अशी या भागातील रहिवाशांची तक्रार आहे.

विजेचा कडकडाट आणि अनेक सखल भागात पाणी साचले असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मंगळवारी सकाळच्या सुमारास भाईंदर पूर्व परिसरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित केला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्या भागातील बँकेतील कामकाज ठप्प झाले, तर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मालकांनी आपल्या कामगारांना सुट्टी जाहीर केली. मीरा रोड आणि भाईंदर भागातील अनेक गृहसंकुलात आणि दुकानात पाणी शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे

आपले नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून पालिका प्रशासनाने भरपाईची मागणी केली आहे.