चालू आर्थिक वर्षांत निम्म्याहूनही कमी जणांचा मालमत्ता कर भरणा

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा तसेच मुंब्रा परिसराच्या विकासासाठी प्रशासनाने गेल्या काही वर्षांत कोटय़वधी रुपयांचा निधी दिला असला तरी हे दोन्ही परिसर मालमत्ता कर वसुलीत मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. दिवा परिसरातून जेमतेम २९ टक्के तर मुंब्रा परिसरातून ४२ टक्के मालमत्ता कराची वसुली झाली असून आता अवघ्या महिनाभरात येथील करवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ठाणे महापालिकेच्या वेशीवर दिवा परिसर आहे. त्याशेजारीत मुंब्रा परिसर आहे. हे दोन्ही परिसर विकासापासून वंचित होते. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच स्थानिककडून सातत्याने ओरड होत होती. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या दोन्ही परिसराच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार या भागात पायाभूत सुविधा पुरविण्यासह विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. असे असतानाही हे दोन्ही परिसर मालमत्ता कर वसुलीत मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या मालमत्ता करविभागाने राबवलेल्या करसंकलन मोहिमेअंतर्गत सर्वाधिक कर वसुली माजिवाडा-मानपाडा, उथळसर आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात, तर सर्वात कमी कर वसुली दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे.

वसुली आकडेवारी

प्रभाग समिती                वसुली         टक्के

उथळसर                          ३२.७५        ७३

नौपाडा-कोपरी                   ६५.५८        ७३

कळवा                               २०.३५        ६६

मुंब्रा                                  १४.९८        ४२

दिवा                                  २५.७९        २९

वागळे इस्टेट                      १६.०१        ६४

लोकमान्य-सावरकर           २१.५४         ७४

वर्तकनगर                           ६५.४७        ६९

माजिवडा-मानपाडा            १२३.११        ७५

यंदा १२ कोटींची वाढ

पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता करापोटी ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. या कराच्या वसुलीवर महापालिका प्रशासनाकडून भर दिला जात असून ९ फेब्रुवारीपर्यंत ४२४ कोटी रुपयांच्या कराची वसुली झाली असून त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. असे असले तरी उर्वरित २२६ कोटी रुपयांच्या कराची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

सर्वाधिक कमी वसुली झालेल्या दिवा आणि मुंब्रा भागात कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २९ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कर भरला तर त्यावर सवलत दिली जात असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

ओमप्रकाश दिवटे  उपायुक्त, ठाणे महापालिका