अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

सध्या रस्त्यावर मिळणाऱ्या गारेगार बर्फाचा गोळा आणि सरबते प्यायल्याने अतिसाराची साथ पसरली आहे. त्यामुळे अन्न आणि औषध विभागाने हा बर्फ नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी सायंकाळी उल्हासनगर येथून २६ हजार रुपये किमतीचा बर्फ नष्ट करण्यात आला, तर ऐरोली सेक्टर क्रमांक १९ येथून २४०० रुपयांचा ६०० किलो बर्फ नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आली. या अखाद्य बर्फावर अंकुश लावण्यासाठी असा बर्फ बनविणाऱ्या कंपनीची सभा घेण्याची मोहीमही अन्न व औषध प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे.

खाद्य स्वरूपाचा बर्फ बनविणाऱ्या ऐरोली, भिवंडी, ठाणे येथे एकूण पाच कंपन्या आहेत. ठाणे जिल्ह्य़ात अखाद्य बर्फ बनविण्याच्या एकूण ३० कंपन्या असल्याची माहिती अन्न व औषध विभागातर्फे देण्यात आली. या वेळी अखाद्य बर्फ हा कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याने तो निकृष्ट दर्जाचा असतो; मात्र हा बर्फ कमी पैशांमध्ये विकत मिळतो. त्यामुळे गोळा विक्रेते तसेच सरबत विक्रेते हा बर्फ वापरतात. अखाद्य बर्फ वापरावर र्निबध बसवावेत यासाठी संबंधित कंपन्यांच्या मालकांची येत्या दोन दिवसांत सभा बोलविण्यात येणार आहे. अखाद्य बर्फ बनविताना त्यात रंगाचा वापर करावा, अशी सूचना करण्यात येणार आहे.

अखाद्य बर्फ ओळखण्यास सोईस्कर होईल, असे अन्न व औषध विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी सांगितले. तसेच हा बर्फ कंपनीतून विकताना कशासाठी वापरण्यात येणार आहे याची साधारण खात्री करूनच तो विकावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मासळी विक्रेत्यांनाही हा बर्फ विकू नये तसेच विक्रेत्यांनीही अशा निकृष्ट बर्फामध्ये माशांची साठवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गोळा विक्रेत्याने किंवा सरबत विक्रेत्याने बर्फ कुठे साठवणूक करून ठेवला आहे, याची खात्री करावी आणि निकृष्ट दर्जाचा बर्फ  असल्याची शंका आल्यास अन्न व औषध विभागाच्या १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी आवाहन नागरिकांना केले आहे.