जवानांकडे जुने आणि नादुरुस्त साहित्य; फाटके गमबूट, फायर सूट आणि निकृष्ट हेल्मेट

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने यासाठी वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन कक्ष तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाले आहेत, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडे निकृष्ट यंत्रणा असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवानांकडे असलेली अनेक उपकरणे जुनाट आणि नादुरुस्त आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

९ ते ११ दरम्यान येणाऱ्या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेने आपत्कालीन कक्ष उघडले आहेत. यंत्रणेने मान्सूनपूर्व संपूर्ण तयारी केली असून दिवाणमान येथे असणारे मुख्य केंद्र २४ तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही येथील जवानांना रेनकोट देण्यात आले नसल्याचे अग्निशमन जवानांकडून सांगण्यात आले, तसेच पालिकेच्या इतर सहा केंद्रांवर कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. लाइफ जॅकेट, जीवरक्षक, बोट सज्ज करण्यात आली असल्याचे अग्निशमन विभागाच्या दिलीप पालव यांनी सांगितले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांना चार ते पाच वर्षांपासून देण्यात आलेला फायर सूट फाटलेल्या अवस्थेत असून तो नवीन देण्याची मागणी होत आहे. मुख्य म्हणजे हेल्मेट, गमबूट, फायर एक्स यांची अवस्था बिकट झाली असून प्रत्येकाला एक असा हवा असलेला फायर एक्स हा ४ मिळून एक असा वापरण्यासाठी आहे. वसई-विरार महापालिकेत एकूण २२३ अग्निशमन जवान आहेत. मात्र निम्म्याच जवानांना गमबूट, हेल्मेट, फायर सूट यांसारख्या सुविधा असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

या सर्व प्रकारावरून वसई-विरार महानगरपालिकेतील जवान हे कितपत सुरक्षित आहेत हे निदर्शनास येत असून जर अग्निशमन जवान सुरक्षित नसतील तर ते कशा प्रकारे वसई-विरारच्या रहिवाशांना सुरक्षित करणार, असा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे आधी अग्निशमन जवानांना योग्य त्या सोयीसुविधा देण्याची मागणी येथील नागरिक यशवंत जाधव यांनी केली आहे.

याबाबत पालिका अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीमध्ये असल्याचे सांगितले.