जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी ४० ते ५० टक्क्यांवरच

ठाणे : गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आठवडय़ाभरापासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांत जोरदार हजेरी लावली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असून जुलै महिना उजाडला तरी अनेक धरणांमधील पाणीसाठय़ात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या धरणांमध्ये अवघा ४० ते ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून समाधानकारक पाऊस पडत नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या आठवडय़ाभरापासून मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यामधील अनेक तलावही ओसंडून वाहत आहेत. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली असून जुलै महिन्यात या ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा या धरणांच्या पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदाची पाणीपातळी कमी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ९ जुलै रोजी भातसा धरणात ३९४.५३७ दलघमी इतका पाणीसाठा होता. तोच यंदा ३८९.३८० इतका आहे. मोडकसागर धरणात गेल्या वर्षी याच कालावधीत ७६.८१० दलघमी पाणीसाठा होता. यंदा मोडकसागर धरणात ४३.२६० दलघमी पाणी भरले आहे. तर, तानसा धरणात गेल्या वर्षी ९ जुलै रोजी ६६.४२८ दलघमी इतका पाणीसाठा होता. तोच पाणीसाठा यंदा २८.६०८ दलघमी इतका आहे.

मध्य वैतरणामध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला ८३.९३५ इतके पाणी होते. यंदा या ठिकाणी ३५.१३० इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात यात कालावधीत ९८.७६० दलघमी पाणीसाठा होता. मात्र, धरणाची उंची वाढवल्यामुळे या धरणात यंदा १४६.७०० दलघमी पाणीसाठा आहे. असे असले तरी महिनाभरापासून या ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. दरम्यान, धरणक्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस नसला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती चांगली आहे. पावसाला आत्ताच सुरुवात झाली असून धरण परिसरातही समाधानकारक पाऊस पडेल, अशी आशा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

धरणांमधील ९ जुलैचा पाणीसाठा (टक्केवारीत)

 धरण    मागील वर्षीचा  पाणीसाठा     सध्याचा पाणीसाठा    

भातसा                            ४१.८८              ४१.३३

मोडकसागर                     ५९.५८             ३३.५५

तानसा                             ४५.७९              २०.४१

मध्य वैतरणा                   ४३.३७              १८.१५

बारवी                              २९.१५               ४३.२९