नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका

एमकॉमच्या प्रथम वर्ष परीक्षेसाठी नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार भाईंदर येथील एका परीक्षा केंद्रावर घडला आहे.  प्रश्नपत्रिकेच्या या गोंधळामुळे विद्यार्थी चांगलेच धास्तावले असून त्यांनी फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

एमकॉमच्या प्रथम वर्ष परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना भाईंदर पश्चिम येथील रिना मेहता महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या वर्षांच्या नव्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेले सुमारे १५० विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. सोमवारी या विद्यार्थ्यांचा ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’ या विषयाचा पेपर होता. या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकाच देण्यात आल्या. या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न नव्या अभ्यासक्रमाशी मिळते जुळते असल्याने आपल्याला जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही. प्रश्नपत्रिकेतील इतर प्रश्न मात्र विद्यार्थ्यांना सोडवता आले नाहीत, परंतु पेपर कठीण काढण्यात आला असेल, अशी समजूत विद्यार्थ्यांची झाली.

परीक्षा संपल्यानंतर यातील एक विद्यार्थी पंकज वालेंद्र याला त्याच्या मित्राचा फोन आला. हा मित्र वसई येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होता. त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना सुरुवातीला जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले, परंतु परीक्षा सुरू झाल्यानंतर सुमारे पाऊण तासाने झालेली चूक केंद्र प्रमुखांच्या लक्षात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या, तसेच वेळदेखील वाढवून देण्यात आली असल्याची माहिती या मित्राने पंकजला दिली.

शंका आल्याने पंकज याने मित्राला देण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी आपल्याकडच्या प्रश्नपत्रिकेसोबत केली असता त्यात मोठी तफावत असून दोन्ही प्रश्नपत्रिकेवरील सांकेतिक क्रमांकदेखील वेगळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाईंदरच्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना मिळालेली प्रश्नपत्रिका जुन्या अभ्यासक्रमाची असल्याचे उघड झाले. पंकज याने रिना मेहता महाविद्यालयातील परीक्षा केंद्र प्रमुखांशी लगेचच संपर्क साधला. मात्र परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका आल्याचे त्याला सांगण्यात आले. यासंदर्भात रिना मेहता महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाशी पत्रव्यवहार केला असून नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या असल्याने विद्यार्थ्यांचा पेपर तपासणीसाठी त्यादृष्टीने विचार करावा असे या पत्रात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांना मात्र हा खुलासा मान्य नाही. गेल्या काही महिन्यांपासून नव्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून परीक्षा दिली आहे, परंतु परीक्षा यंत्रणेच्या गोंधळामुळे या मेहनतीवर पाणी फिरणार असल्याने ‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’ विषयाची फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे पंकज वालेंद्र याने सांगितले. या संदर्भात विद्यार्थ्यांनीही मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांची पुढील विषयाची परीक्षा बुधवारी आहे, परंतु झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण झाले आहे.