News Flash

मकाव पोपट

अनेक प्रकारचे पोपट असतात. त्यातील मकाव पोपटांचे घरातील वास्तव्य कायम उत्साहवर्धक असते.

अनेक प्रकारचे पोपट असतात. त्यातील मकाव पोपटांचे घरातील वास्तव्य कायम उत्साहवर्धक असते. ते आपल्या मालकाचे लक्ष कायम वेधून घेतात. घरातील इतर सदस्यांपेक्षा आपली खास ओळख निर्माण करतात. त्यामुळे मकाव पोपट सध्या जगभरातील पक्षीप्रेमींच्या पसंतीस पडत आहेत. श्वान किंवा मांजर या पाळीव प्राण्यांपेक्षा चपळ असणारा एखादा पाळीव पक्षी त्याच्या विशिष्ट गुणांमुळे लोकप्रिय ठरतो. मकाव पोपट हा त्यापैकीच एक. मकाव पोपट फार जुन्या काळापासून अस्तित्वात आहेत. मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात मकाव पोपट आढळतात. घनदाट जंगलात या मकाव पोपटांचे अधिकाधिक वास्तव्य पाहायला मिळते. लाकूडतोड करताना काही लाकूडतोडय़ांच्या नजरेस हे मकाव पोपट पडले. यानंतर या पोपटाला जगभरातून मागणी वाढू लागली. अलीकडे जंगलतोडीमुळे या मकाव पोपटाच्या अनेक  जाती लुप्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. विशिष्ट आकार आणि रंगामुळे मकाव पोपट पक्षीप्रेमींच्या अधिक पसंतीस पडतात. सध्या एक ते दीड लाख रुपये किंमतीपासून बाजारात मकाव पोपट उपलब्ध असल्याचे श्रीमंताचे मकाव अशी ओळख या पक्ष्याला प्राप्त झाली आहे. मोठे डोके आणि आकर्षक रंगामुळे हा पक्षी लक्ष वेधून घेतो. या पोपटाच्या ब्लू गोल्ड, ब्लू थ्रोटेड, ग्रीन विंग, हॅकिंथ, मिलेटरी, रेड फ्रंट हेड, कार्लेट अशा वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. कार्लेट आणि ब्लू गोल्ड ही प्रजात अधिक लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मकाव पक्ष्याला साधारण पन्नास वर्षांपर्यंत आयुष्य लाभले आहे.

खाण्यासाठी शंभर किमीपर्यंतचा प्रवास

मकाव पक्ष्याचे वैशिष्टय़ म्हणजे एखादा खाद्यपदार्थ या पोपटाला खायचा असल्यास त्या खाद्यपदार्थाच्या शोधात शंभर किमीपर्यंतचा लांबचा प्रवास करण्याची क्षमता या पक्ष्यांमध्ये असते. विशिष्ट खाद्यपदार्थ कोणत्या ठिकाणी मिळतो, याबाबत मकाव पोपटाला माहिती असते. शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मकाव पोपट विशिष्ट पद्धत वापरतात. नदीच्या किनाऱ्याजवळची माती खाऊन हे पोपट आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.

मकाव पोपट घरात पाळण्यासाठी अतिशय खेळकर आहेत. घरात सतत असणारी कुजबुज तसेच या पक्ष्याचे वास्तव्य आनंद देणारे असते. मात्र या पक्ष्याला घरात पाळायचे असल्यास हा पक्षी लहान असतानाच घरात आणावे लागते. माणसांमध्ये राहण्याची सवय लहान वयापासूनच असल्यास या पक्ष्यांना हाताळणे सोपे जाते. या पक्ष्यांना सतत आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची सवय असते. घरात पाळल्यावर यांच्याकडे लक्ष न दिल्यास कर्कश आवाज काढून हे पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. त्यासाठी कायम या पक्ष्याला कामात व्यग्र ठेवावे लागते किंवा सोबतीला आणखी एक पक्षी आणून ठेवावा लागतो. मात्र मकाव पक्षी पिंजऱ्यात एकटाच शोभून दिसतो. या पक्ष्याची चोच दोन ते तीन इंचांएवढी मोठी असते. अक्रोड, बदाम सारखी कडक फळे हे पक्षी सहज फोडू शकतात. कॅप्टिव्हिटीमध्येसुद्धा या पक्ष्याचे ब्रीडिंग केले जाते. समतोल आहार, पुरेशी जागा, फिरण्यासाठी व्यायाम आणि वर्षभरात एकदा लसीकरण असल्यास मकाव पक्षी उत्तमरीत्या आयुष्य जगू शकतात.

लांब पल्ल्यापर्यंत आवाजाची तीव्रता

मकाव पोपटाचे वैशिष्टय़ म्हणजे हा पक्षी आपले लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडला तर एकशे पाच डेसिबल्स लांब पल्ल्यापर्यंत आवाज जाण्याची क्षमता या पक्ष्याच्या ओरडण्यामध्ये असते. हे पोपट मालकाने शिकवलेले बोलू शकतात. ग्रे पॅरटसारखे हुबेहूब या पोपटांना बोलता येत नाही, मात्र प्रशिक्षण दिलेले मकाव मालकाशी साधम्र्य साधण्याचा प्रयत्न करतात. शिकवलेले आवाज काढण्याची क्षमताही या पक्ष्यांमध्ये असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:57 am

Web Title: macaw parrot
Next Stories
1 पुन्हा एकदा ‘संगीत सौभद्र’
2 मॉलमध्ये महिलांना लुटणारा भामटा अटकेत
3 पूजेतील पत्रीतून आदिवासींचा प्रपंच
Just Now!
X