पालिकेकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात

प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळावेळी जागृती आणि नियम केले जात असतानाही प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या वापरण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने प्लॅस्टिकची घनता कमी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅस्टिकचा आकार आणि घनता कमी करणारी ‘बेलिंग’ यंत्रे शहरातील रेल्वेस्थानके, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी बसवण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाने निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांत ही यंत्रे कार्यान्वित होतील, असा प्रशासनाचा दावा आहे.

प्लॅस्टिक पिशव्या, शीतपेयाचे कॅन तसेच बाटल्या, तंबाखू विक्रीची वेष्टने यांसारख्या प्लॅस्टिकच्या वापरावर या यंत्रांमार्फत जागच्या जागी प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. शहरातील बाजारांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठी महापालिकेने यापूर्वीच कागदी पिशव्यांचे वितरण करण्याची मोहीम आखली आहे. यासंबंधी वितरण व्यवस्था उभी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना प्लॅस्टिकच्या बाटल्या, शीतपेयाचे कॅन तसेच इतर प्लास्टिकच्या वस्तूंवर प्रक्रिया करणारी यंत्रणा शहरात विविध ठिकाणी उभारण्याच्या हालचाली वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

महापालिकेमार्फत नेमण्यात येणाऱ्या ठेकेदारामार्फत ही बेलिंग यंत्रे उभारली जाणार आहेत. या यंत्रांमुळे प्लॅस्टिकचा आकार आणि घनता कमी होणार आहे. ही यंत्रे सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ठाण्यातील जांभळी बाजारपेठ परिसरात एक, रेल्वे स्थानक परिसरात दोन आणि अशोक टॉकीज परिसरात असलेल्या बस स्थानक परिसरात एक असे यंत्र बसविले जाणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. साधारण तीन महिन्यांच्या अवधीमध्ये या मशीन बसविण्यात येणार असून शहरातील प्लॅस्टिकचा निचरा करता यावा यासाठी या यंत्रांचा उपयोग होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली.

शीतपेयाचे कॅन, तंबाखू उत्पादनाची वेष्टने, वेफर्स तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी वापरात आणले जाणारे प्लॅस्टिक या यंत्रात टाकताच हायड्रोलिक प्रेसद्वारे त्या कचऱ्याचा आकार तसेच प्लास्टिकची घनता कमी करण्यात येणार आहे. सध्या जरी हे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची उपयुक्तता पाहून शहरभर ही यंत्र उभारली जाणार आहेत.

मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, ठाणे महापालिका