News Flash

शहरबात : रिंगरूटच्या मार्गात माफियांचे अडथळे

वाढत्या बाजारपेठीय किमतीमुळे प्रकल्पाची किंमत ९० कोटींवरून ८५० कोटींपर्यंत वाढली आहे.

कल्याण-वाडेघर परिसरात तयार झालेला रिंगरूट रस्ता.

भगवान मंडलिक

टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-काटई ते हेदुटणे हा महत्त्वाकांक्षी बाह्य़वळण प्रकल्प रखडला आहे. रडतखडत सुरू असणारे विकास प्रकल्प या शहरांना तसे नवे नाहीत. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलत असल्याची आशा येथील रहिवाशांच्या मनात उभी राहिली. अलीकडच्या काळात काही महत्त्वाच्या उड्डाणपुलांची कामे वेगाने मार्गी लागली तर काही ठिकाणी कामांचा वेग समाधानकारक आहे. असे असताना तब्बल २० वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेला २१ किलोमीटर अंतराचा या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामात भूखंड माफियांनी उभे केलेले अडथळे दूर करण्यात येथील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला यश का मिळत नाही, हा प्रश्न येथील नागरिकांना सतावू लागला आहे.

कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून जाणारा, शहरातील वाहतुकीचे विभाजन आणि वाहतुकीत सुसूत्रता आणणारा टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-काटई ते हेदुटणे (२७ गाव) गावापर्यंत विस्तारित असलेला २१ किलोमीटरचा बाह्य़वळण रस्ता (रिंगरूट) शहराच्या रस्ते बांधणीतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अनेक वर्षे आर्थिक, राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडला. हा रस्ता १५ वर्षांपूर्वी तयार झाला असता तर कल्याण, डोंबिवलीकरांचे जगणे काही प्रमाणात सुसह्य़ झाले असते. सात वर्षांपूर्वी पालिकेच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने दिलेल्या ८५० कोटी रुपयांच्या भरभक्कम निधीतून बाह्य़वळण रस्त्याचे काम सात टप्प्यांत सुरू आहे.

वाढत्या बाजारपेठीय किमतीमुळे प्रकल्पाची किंमत ९० कोटींवरून ८५० कोटींपर्यंत वाढली आहे. टिटवाळा ते कल्याण, डोंबिवली शहराला वळसा घालून कोपर, आयरे, भोपर, घारिवली, काटई, शिळफाटा रस्ता ओलांडून हेदुटणे गावाकडे (बदलापूर पाइपलाइन रस्ता) जाणारा हा रस्ता या भागातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल यात शंकाच नाही. टिटवाळा दिशेने सुरू होणारा हा रस्ता मोहने, आंबिवलीजवळून कल्याणजवळच्या गंधारे उड्डाण पुलाजवळून जाणार आहे. टिटवाळा, गांधारे, बारावे, मोहने परिसरातील रहिवासी वाहनाने वळण रस्त्याने मुंबई-नाशिक महामार्ग, पडघा दिशेने जाऊ शकतील. हा रस्ता दुर्गाडी चौकातून पत्रीपूल दिशेने येणार आहे.

खडकपाडा, कल्याणमधील मध्यवर्ती भागातील वाहनचालक दुर्गाडी चौकापर्यंत वळण रस्त्याने पुढे दुर्गाडी पुलावरून भिवंडी दिशेने जाऊ शकतील. दुर्गाडी चौकात येण्यासाठी यापूर्वी बाजारपेठ, रेल्वे स्थानकाकडून यावे लागत होते. तो वळसा यापुढे वाहनचालकांना घ्यावा लागणार नाही. पत्रीपुलाजवळ वळसा घेऊन वळण रस्ता उल्हास खाडीला समांतर डोंबिवलीत गणेशनगर, कुंभारखाणपाडा, गरिबाचा वाडा, देवीचा पाडा, मोठागाव (माणकोली उड्डाणपूल), कोपर, भोपर, घारिवली, शिळफाटा रस्ता, काटईवरून पुढे २७ गावांतील हेदुटणे गावापर्यंत जाणार आहे. कचोरे, डोंबिवलीतील बाह्य़वळण रस्त्यालगतचा रहिवाशांचा शहरात येण्याचा फेरा यामुळे वाचेल. या वळण रस्त्याने हे रहिवासी माणकोली पुलावरून ठाणे, कोपर, भोपर मार्गे शिळफाटा रस्ता येथे जातील. २७ गाव, पलावा, लोढा, रौनक सिटी गृहसंकुलांमधील रहिवासी शिळफाटा, डोंबिवली, कल्याण शहरात येण्याऐवजी बाह्य़वळण रस्त्याने थेट टिटवाळा येथे जाऊ शकणार आहेत. शहरात बाहेरील वाहने येणार नसल्याने रस्त्यांना मोकळा श्वास घेणे शक्य होणार आहे.

माफियांचा अडथळा

कल्याण-डोंबिवली पालिकेने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला भूसंपादन करून जमीन हस्तांतरण करून द्यायचे आहे. रस्ते कामासाठी ८० टक्के भूसंपादन झाले की प्राधिकरण त्या रस्तेकामाची निविदा काढून काम सुरू करते. पाच वर्षांपासून या कामासाठी महापालिकेकडून भूसंपादन होताना जमीन मालक, विकासक, चाळ मालक यांनी अडथळे आणले. त्यामुळे या रस्तेकामासाठी सलग पट्टय़ात भूसंपादन करणे नगररचना विभागाला जमले नाही. टिटवाळा ते गंधारे उड्डाणपूल, गंधारे ते दुर्गाडी पूल, पत्रीपूल ते गणेशनगर, गणेशनगर ते मोठागाव अशा टप्प्यांमध्ये पालिकेने भूसंपादन करीत जमीन प्राधिकरणाला हस्तांतरित केली. या सहा ते आठ टप्पे मार्गातील ४५ मीटर रुंदीचे रस्ते बांधून पूर्ण झालेत. हेदुटणे ते कोपपर्यंतचे एक ते पाच टप्पे रखडले आहेत. या रस्त्यांना कल्याण, डोंबिवली शहरातून येणारे पोहोच रस्ते जोडले जाणार आहेत. विकास आराखडय़ातील शहराच्या वेशींवरील अडगळीत असलेले, बेकायदा बांधकामांनी व्यापलेले रस्ते विकसित होणार आहेत. या रस्तेकामाच्या नस्ती मंजूर आहेत. या रस्त्याचे गरिबाचा वाडा, देवीचा पाडा ते मोठागाव टप्प्यांतील काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे. माणकोली उड्डाणपुलाजवळील वळण रस्तेकामाचा टप्पा मार्गी लागणार आहे. हे होत असताना कोपर पूर्व, आयरे, भोपर, घारिवली, काटई ते हेदुटपणेपर्यंत वळण रस्ते मार्गातील भूसंपादन तत्परतेने होणे आवश्यक आहे. या भागात अनेक बेकायदा बांधकामे, चाळी उभ्या आहेत. या बांधकामांना तथाकथित नेते आणि चाळ सम्राटांचे संरक्षण आहे. या इमल्यांवर हातोडा पडू नये म्हणून रहिवाशांना पुढे करून ही मंडळी वळण रस्तेकामासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करून देण्यास भूमिअभिलेख कर्मचारी, नगररचना विभागातील कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्त असूनही कडाडून विरोध करीत आहेत. या आक्रमक विरोधामुळे या भागातील मोजणी मागील चार वर्षांपासून झालेली नाही. केवळ माफियांच्या चाळी वाचविण्यासाठी वळण रस्त्याचे आयरे ते भोपर, हेदुटणेपर्यंतचे महत्त्वाचे टप्पे पूर्ण होणार नसतील तर या रस्ते बांधणीचा मूळ उद्देश संपुष्टात येईल.

एकही लोकप्रतिनिधी, नगरसेवक या विषयावर शब्द काढण्यास तयार नाही. कोपर पूर्व, आयरे, भोपर, घारिवली भागांतून जाणाऱ्या बाह्य़वळण रस्त्याला आयरे, नांदिवली, गांधीनगर, पी अ‍ॅन्ड टी वसाहत भागांतील पोहोच रस्ते, विकास आराखडय़ातील रस्ते येऊन मिळणार आहेत. वाहतुकीचे पूर्ण विभाजन एका वळण रस्त्याने होणार आहे. जे शेतकरी रस्त्यासाठी स्वत:हून जमिनी देत आहेत त्यांचे ‘टीडीआर’चे प्रस्ताव नगररचना अधिकारी वर्षांनुवर्षे मंजूर करत नाहीत. नगररचना अधिकारी, आयुक्त शेतक ऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी हेलपाटे मारण्यास भाग पाडतात. या महत्त्वपूर्ण रस्ते कामात माफिया, चाळ-बंगले-इमले सम्राट अडथळे आणत असतील तर त्याचा बीमोड करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिकांचे सख्य असते. त्यामुळे बाहेरील राखीव पोलीस फौजेच्या उपस्थितीत कोपर, आयरे ते भोपर, घारिवली, काटई ते हेदुटणे पट्टय़ातील वळण रस्त्यासाठी सर्वेक्षण, मोजणी आणि भूसंपादनाची कामे उरकून हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्याची गरज आहे. येत्या काळात अशी कठोर पावले यंत्रणांमार्फत उचलली जातील ही अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:15 am

Web Title: mafia obstacles in ring road work zws 70
Next Stories
1 सर्वच रुग्णालयांचे परीक्षण         
2 ठाण्यात चार करोना रुग्णांच्या मृत्यूबाबत गूढ
3 ठाण्यात रुग्णांच्या मृत्यूमुळे गदारोळ; ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Just Now!
X