८६ हजार चौ.मी.चा भूखंड आरक्षित करण्याची तयारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयाची भव्य वास्तू प्रशस्त जागेत असावी या उद्देशाने मुख्यालय कल्याण-डोंबिवली शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कचोरे गावाच्या हद्दीत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या वास्तूच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला भूखंड बगिचा आरक्षणाचा असल्याने अडचण होती. त्यामुळे बगिच्यासाठी आरक्षित असलेला ८६ हजार ६६० चौरस मीटरचा भला मोठा भूखंड मुख्यालयाच्या नव्या इमारतीसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरक्षित जमिनीचे क्षेत्रफळ मुख्यालयाच्या वास्तू उभारणीसाठी घ्यावयाचे असल्याने त्याला शेतकरी, जमीन मालक, जागरूक नागरिक यांची हरकत असेल तर त्यांनी महापालिकेच्या नगररचना विभागात ३० दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. जमीन मालकांच्या हरकती सूचना असतील तर त्याचा महापालिका स्तरावर विचार करून मग बगिचा आरक्षणातील काही भाग मुख्यालय इमारत उभारणीसाठी वापरण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे शक्य होणार आहे. विहित मार्गाने आरक्षण जमीन प्रशासकीय वास्तूसाठी घेतल्याने पुढे या इमारतीच्या उभारणीत कोणतेही अडथळे येणार नाहीत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयाची वास्तू मागील ४० वर्षांपासून शंकरराव चौकात उभी आहे. कल्याण शहरातील वाढती वस्ती, पालिका इमारतीच्या चारही बाजूने व्यापारी, निवासी संकुले, शंकरराव चौक, शिवाजी चौकाच्या ठिकाणी ही वास्तू असल्याने पालिका मुख्यालयात यायचे असेल तर नगरसेवक, अधिकाऱ्यांना दररोज या चौक, रस्त्यांवरील वाहनकोंडीचा सामना करत यावे लागते. नवी मुंबई, पालघर, अंबरनाथ शहरांमध्ये शहराच्या बाहेर नागरिकांना येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असेल अशा मध्यवर्ती ठिकाणी प्रशासकीय वास्तू उभारण्यात आल्या आहेत.

अतिशय अडगळीच्या जागेत सध्याची पालिका मुख्यालयाची वास्तू असल्याने सर्व पक्षीय पदाधिकारी, आयुक्तांनी कचोरे येथील बगिचासाठी आरक्षित असलेल्या एक लाख ७८ हजार ८०० चौरस मीटर भूखंडाची दोन महिन्यापूर्वी पाहणी केली. हा भूखंड प्रशासकीय इमारतीसाठी सुयोग्य असल्याचा अभिप्राय सर्व पदाधिकारी, आयुक्तांसह उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला. समोर उल्हास खाडी, चारही बाजूने मोकळी जागा आणि मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू उपलब्ध होईल या विचारातून कचोरेची जागा निश्चित करण्यात आली.

एकाच ठिकाणी करदात्या नागरिकांना नागरी सेवा मिळावी. प्रशस्त इमारतीबरोबर, वाहनतळ, चारही बाजूने मोकळी हवा असे वातावरण कचोरे येथे आहे. समोर खाडीकिनारा आहे. दोन्ही शहरातील रहिवाशांना मध्यवर्ती असे हे ठिकाण आहे. म्हणून कचोरेतील जागेची निवड करण्यात आली. आरक्षण फेरबदल, शासन मंजुरीच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुख्यालय इमारत उभारणीच्या कामाला लवकर प्रारंभ करता येईल.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त