मंजुरीसाठी उद्या महासभेत सादर होणार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले फेरीवाला धोरण अखेर वसई-विरार महापालिकेने तयार केले असून बुधवारी होणाऱ्या महासभेत ते मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या नव्या धोरणानुसार शहरातील प्रभागानुसार फेरीवाल्यांसाठी क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात १२ हजार ७६८ आणि २ हजार ३८८ अस्थिर फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

वसई-विरार शहरातील फेरीवाल्यांची वाढत्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अस्वच्छता आदी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. हजारो अनधिकृत फेरीवाल्यांनी शहरातील रस्ते गिळंकृत केले होते. पालिकेचे इतक्या वर्षांत फेरीवाल्यासंदर्भात कोणतेही धोरण आखले नसल्याने फेरीवाल्यांनी मिळेल तिथे दुकान थाटले होते. यामुळे शहरच बकाल झाले होते. फेरीवाला धोरण तयार करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र ते तयार नसल्याने ही समस्या उग्र बनली होती. अखेर महापालिकेला जाग आली आणि त्यांच्यासाठी नवे धोरण आखण्यात आले आहे. हे धोरणावर बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

पालिकेच्या या नव्ये फेरीवाला धोरणानुसार विक्रीसाठी नागरी नियोजन व शहरातील  फेरीवाल्यांचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून त्यानुसार त्यांची नोंदणी करणे, ओळखपत्र देणे, फेरिवाल्यांचा डाटाबेस तयार करून खरेदी विक्रीसाठी फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

फेरीवाले रहदारीच्या ठिकाणी तसेच बस स्थानक, रेलेवे स्थानक, रुग्णालये धार्मिक स्थळे या ठिकाणी व्यवसाय करतात त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो त्यासाठी शहरातील ९ प्रभाग निहाय फेरिवाला क्षेत्र तयार करम्ण्यात आले असून सर्वाधिक म्हणजे १८ फेरीवाला क्षेत्र प्रभाग समिती ‘ब’च्या अखत्यारित आहेत.

कार्यकौशल्य विकास आणि फेरीवाल्यांसाठी लघुव्यवसाय सहाय्य अभियानांतर्गत फेरीवाल्यांना रोजगार प्रशिक्षण देणे. फेरीवाल्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना बँकिंग सेवा तसेच क्रेडिड कार्ड उपलब्ध करून देणे. फेरीवाल्यांसाठी बाजारपेठांचा विकास करून देणे. सामाजिक  सुरक्षतेची एक केंद्राभिमुखता या द्वारे फेरीवाल्यांना केंद्र व राज्य शासनाकडील सुरक्षितता लाभ व इतर शासकीय योजनाचा लाभ मिळवून देणे  आदी तरतुदींचाही या धोरणात समावेश आहे. . त्यामुळे प्रभाग निहाय फेरीवाला झोन तयार करणे,

वसई विरार महापालिकेने फेरीवाल्यांची २०१६ रोजी बायोमट्रिक पद्धतीने नोंदणी केली आहे. यात स्थिर १२ हजार ७६८ आणि अस्थिर २ हजार ३८८ फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे.  महासभेची अंतरिम मजुरी प्राप्त झाल्यास फेरीवाल्यांना स्मार्ट कार्ड, विक्री परवाना, ओळखपत्र इत्यादी वाटप करणायत येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दिली आहे. या फेरिवाला धोरणात सदस्यांच्या सुचनेंतर बदल करण्यात येईल. नव्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.