ठाणे पोलिसांचा पुन्हा ६० दिवसांचा प्रयोग; सर्वसामान्य वाहनचालकांची कोंडीतून सुटका

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : रस्त्याच्या दुतर्फा वाढती गृहसंकुले आणि मोठमोठय़ा कंपन्या यांमुळे सर्वसामान्यांच्या वर्दळीचा मार्ग बनलेल्या शिळफाटा-महापे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून या वाहनांना शिळफाटा-तळोजामार्गे जवाहरलाल बंदराच्या दिशेने सोडण्यात येत आहे. त्यामुळे शिळफाटा-महापे तसेच मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीत घट होणार आहे.

नागरिकांकडून येणाऱ्या अभिप्रायामुळे हा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिळफाटय़ाहून महापेमार्गे जेएनपीटी जाणाऱ्या अवजड वाहनांना महापेऐवजी शिळफाटा, कल्याणफाटा, दहिसर मोरी-तळोजामार्गे जाता येणार आहे. त्यामुळे शिळफाटा, मुंब्रा, पलावा, डोंबिवली, कल्याण येथून नवी मुंबई-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिक वेळेत पोहोचत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे वाहतूक बदल ६० दिवसांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

उरण जेएनपीटी येथील अवजड वाहतूकदारांसाठी शिळफाटा- मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही शिळफाटा भागातील वाहतूक कोंडी सुटत नव्हती.

यासंबंधीचे वृत्तही ‘लोकसत्ता’च्या वाहतूक कोंडी मालिकेतून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये शिळफाटा येथून महापेमार्गे उरण जेएनपीटीला जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदीची अधिसूचना ठाणे पोलिसांनी काढली होती. या अधिसूचनेनुसार अवजड वाहनांना महापे मार्ग वाहतुकीसाठी बंद करून येथील वाहतूक शिळफाटा, कल्याणफाटा, दहिसर मोरी-तळोजामार्गे जाण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला होती. मात्र, ही अधिसूचना केवळ एका महिन्यासाठी आखण्यात आली होती. अधिसूचनेचा कालावधी संपल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. काही नागरिकांनीही पूर्वीची अधिसूचना कायम ठेवण्याची विनंती मुंब्रा वाहतूक उपविभागाकडे केली होती. त्यानुसार पुन्हा एकदा ६० दिवसांच्या कालावधीसाठी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हीच अधिसूचना ठाणे पोलिसांनी कायम ठेवली आहे.  मुंब्रा बाह्य़वळण मार्गाहून महापेच्या दिशेने जाणाऱ्या अजवड वाहनांना महापेमार्गे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही वाहने शिळफाटा, कल्याणफाटा, दहिसर मोरी, तळोजा या मार्गाने सोडण्यात येत आहेत.

फायदा कुणाला?

शिळफाटा, पलावा, डोंबिवली भागात मोठय़ा प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. येथील अनेक नागरिक खासगी वाहनांनी मुंबई-नवी मुंबईच्या दिशेने जात असतात. त्यातच मुंब्रा बाह्य़वळणमार्गे जेएनपीटीच्या दिशेने जाणारी वाहने शिळफाटा चौकातून वळण घेऊन महापे मार्गे जातात. त्यामुळे शिळफाटा चौकातील वाहतूक काही काळ रोखून धरली जात होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. आता, ही अवजड वाहने महापे मार्गावरून वळण न घेता तळोजामार्गे जातील. यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कल्याण, डोंबिवली येथून महापेमार्गे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक समस्या कमी झालेली आहे.