सात महिन्यांपूर्वी लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे पोलीस हवालदार जयसिंग बाबूसिंग रजपूत याच्याकडे ७४ लाख ८९ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. लाचप्रकरणातील अटकेनंतर त्याच्याकडे कोटय़वधीची माया सापडली होती. त्यामुळे बेहिशेबी मालमत्तेच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरू केला होता. त्यामध्ये रजपूत याने बेहिशेबी माया जमविल्याचे उघड झाले आहे.
वाडा येथील एका रसायन कंपनीच्या मालकाकडून ५० हजारांची लाच घेताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह पोलीस हवालदार जयसिंग रजपूत, उदय कोरे आणि सुरेश पाटील या चौघांना जानेवारी महिन्यात अटक झाली होती. रजपूतकडे १७ लाख ५६ हजारांची रोकड आणि १२७ तोळे सोने सापडले होते.  यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
हवालदार रजपूतचे कायदेशीर उत्पन्न ९० लाख २७ हजार ७३२ रुपये इतके असून या कालावधीत त्याने एक कोटी ४२ हजार ८०३ रुपये इतके खर्च केले आहेत. तर याच कालावधीत त्याने ६४ लाख ७४ हजार ३३ रुपये इतक्या किमतीची मालमत्ता जमविली आहे. त्यामुळे त्याने उत्पन्नापेक्षा ७४ लाख ८९ हजार १०४ रुपये बेहिशेबी मालमत्ता जमविली असून ही मालमत्ता एकूण उत्पन्नाच्या तुलनेत ८२.९६ टक्के असल्याचे उघड झाले आहे.