महाराष्ट्रातील गडकिल्ले हे केवळ इतिहास किंवा स्थापत्याचेच पुरावे नाहीत तर, साहस आणि मराठी अस्मितेचेही प्रतीक आहेत. त्यामुळे मराठी तरुणाईला गडकिल्ल्यांचे भारी आकर्षण असते. मात्र, काही मोजक्या गडकिल्ल्यांचा अपवाद वगळता अन्य किल्ल्यांची बहुतेकांना माहितीही नसते. हाच धागा पकडून ठाण्यातील ‘रानवाटा’ या संस्थेच्या तरुणांनी महाराष्ट्रातील ५० गडकिल्ल्यांचा संपूर्ण इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती उलगडून दाखवणारे चॅनेलच ‘यूटय़ूब’ या संकेतस्थळावर सुरू केले आहे.  ‘यूटय़ूब’वरील ‘रानवाटा’च्या अधिकृत चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले असून आतापर्यंत त्याला ५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची पुस्तक वा चित्ररूपात माहिती उपलब्ध असली तरी दृक्श्राव्य माध्यमात त्याबद्दल फारच कमी माहितीपट आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील ‘रानवाटा’ या संस्थेने पुढाकार घेत राज्यातील गडदुर्गावर माहितीपट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी छायाचित्रणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी प्रायोगिक तत्त्वावर या कामाला सुरुवात केली. पाच वर्षांमध्ये ५०हून अधिक किल्ल्यांना भेटी देऊन त्यांचे वेगवेगळ्या दृष्टिक्षेपातून आणि वेगवेगळ्या मोसमातील किल्ल्यांचे चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण दूरचित्रवाहिन्यांवरून प्रदर्शित व्हावे यासाठी या तरुणांचा अट्टहास सुरू झाला. मात्र अनेक दिग्गज वाहिन्यांचे उंबरठे झिजवल्यानंतरही या तरुणांच्या पदरी निराशाच आली. ‘जर तुम्हाला शो चालवायचा असेल तर तसे प्रायोजकसुद्धा घेऊन या..’असा सल्ला त्यांना देण्यात आला. प्रयत्नांना येणाऱ्या अपयशाने खचून न जाता या तरुणांनी ‘यूटय़ूब’ची मदत घेतली. यावर्षी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  या चॅनलची सुरुवात केल्यानंतर या तरुणांनी पहिल्यांदा यंदाच्या वर्षी हरिश्चंद्र गडावर केलेल्या स्वच्छता मोहिमेचा पहिला भाग प्रदर्शित केला. तर त्यानंतर नॅबच्या अंध विद्यार्थ्यांना रायगड भेटीवर नेण्याच्या उपक्रमाचा दुसरा भागही काही कालावधीत प्रदर्शित करण्यात आला आहे. या माहितीपटांना रसिकांचा प्रतिसाद वाढू लागला असून अल्पावधीतच सुमारे पाच हजारांहून अधिक रसिकांनी या शोचे कौतुक केले. शिवाय अशा कामांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती ‘रानवाटा’च्या स्वप्निल पवार यांनी दिली.
सुरुवातीला गडदुर्गाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करून महाराष्ट्रातील गडदुर्ग लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र त्यापेक्षा माहितीपट अधिक प्रभावी ठरू शकतो. त्यामुळेच माहितीपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. – स्वप्निल पवार
या शोच्या निर्मितीसाठी  आवश्यक तांत्रिक यंत्राची उभारणी ठाण्यात करण्यात आली आहे. स्वप्निल पवार यांच्यासह राधेश तोरणेकर, देवेशू ठाणेकर, प्रतीक वैती, मयूरेश मोकल आणि अमेरिकास्थित प्रणव महाजन ही मंडळी या उपक्रमात कार्यरत आहेत.
श्रीकांत सावंत, ठाणे