16 December 2017

News Flash

भिवंडीला राज्याचे ‘अमृत’

राज्य सरकारने भिवंडीसाठी २०५ कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.

जयेश सामंत, ठाणे | Updated: March 21, 2017 3:25 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून २०५ कोटींच्या पाणी योजनेस मंजुरी

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिकेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून राज्य सरकारने आपला मोर्चा आता या शहराच्या विकासाकडे वळवला आहे. वर्षांनुवर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या शहराला ५० दशलक्ष लिटरहून अधिक पाणीपुरवठा उपलब्ध करून देता यावा, यासाठी केंद्र सरकारपुरस्कृत अमृत अभियानांतर्गत राज्य सरकारने भिवंडीसाठी २०५ कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यामुळे येत्या काळात या शहरातील जलवाहिन्या, जलकुंभ तसेच पाणी वितरण सुविधांचा विकास वेगाने होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून चालू आर्थिक वर्षांत राज्याच्या २४८० कोटी रुपयांच्या आराखडय़ास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या आराखडय़ात भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या २०५ कोटी रुपयांच्या आराखडय़ास सरकारने मान्यता दिली असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून १०२, तर राज्य सरकारकडून ५१ कोटी रुपयांचा निधी पालिकेकडे वर्ग केला जाणार आहे, तर सुमारे २१ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी पालिकेला उभारावा लागणार आहे.

पाणीटंचाईच्या काळात मुंबई महापालिकेच्या भातसा धरणातून भिवंडी शहरात अतिरिक्त पाण्याचा वाटा दिला जात असला तरी वाढीव पाणीपुरवठा पदरात पाडून घेण्यासाठी या शहरात सक्षम अशी यंत्रणा नाही. या यंत्रणेचा विकास या नव्या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जलकुंभांची उभारणी, नव्या जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणी अशी महत्त्वाची कामे या माध्यमातून केली जाणार आहे.

पालिकेतील सत्तेकडे डोळा

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश प्राप्त केल्यानंतर भाजपने येत्या वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. भिवंडीतील योजनांच्या मंजुरीमागेही हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असला तरी गेल्या वर्षांत भाजपने स्थानिक पातळीवर ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे खासदार असून पालिकेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. येथील विधानसभेच्या दोन जागांपैकी एक ठिकाणी भाजपचा आमदार आहे, तर पूर्व भागात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे गेल्या निवडणुकीत निसटत्या मताधिक्याने निवडून आले होते.  हे गणित लक्षात घेऊन मुस्लीमबहुल भिवंडीत जोरदार लढत देण्याची तयारी भाजपच्या गोटात सुरू झाली आहे.

First Published on March 21, 2017 3:25 am

Web Title: maharashtra government approved water scheme for bhiwandi