05 March 2021

News Flash

बांधकाम क्षेत्रात तेजीचा ‘मार्च’

नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या निश्चलनीकरणानंतर या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलालाही ओढ लागली होती.

मार्च महिन्यात ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांतील मुद्रांक नोंदणी व्यवहारांतून राज्य शासनाला ६३० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे

ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यंत खरेदी-विक्री नोंदणी जोरात; मार्च महिन्यात ६३० कोटी रुपयांचा महसूल

गेल्या दोनेक वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली वावरत असलेल्या बांधकाम क्षेत्राला नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या निश्चलनीकरणानंतर आणखी हादरे बसल्याचे बोलले जात असताना राज्य शासनाच्या मुद्रांक विभागाकडे झालेल्या विक्रमी वसुलीचे आकडे पाहता, हे क्षेत्र सावरू लागल्याचे दिसून येत आहे. केवळ मार्च महिन्यात ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांतील मुद्रांक नोंदणी व्यवहारांतून राज्य शासनाला ६३० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. यामध्ये अर्थातच, मोठा वाटा मालमत्ता तसेच घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीचा आहे. नोटाबंदीच्या चार महिन्यांनंतर सावरत चाललेली स्थानिक अर्थव्यवस्था आणि रेडिरेकनरच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेने खरेदीदारांनी केलेली घाई या कारणांमुळे बांधकाम क्षेत्रासाठी आणि राज्याच्या तिजोरीसाठी यंदाचा मार्च महिनाही तेजीचा ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मालमत्तांची खरेदी-विक्री, भाडेपट्टा, गहाण, विकास करार यासारखे व्यवहार नोंदणीकृत करार केल्याखेरीज मालमत्तांचे कायदेशीर हस्तांतरण होत नसते. हे व्यवहार करण्यापूर्वी सरकारकडून  मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आकारले जाते. घरखरेदी, विक्रीचे व्यवहार करत असताना राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या रेडीरेकनरच्या दरानुसार या शुल्काची वसुली सरकारमार्फत केली जात असल्याने राज्याच्या उत्पन्नाचा हा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या निश्चलनीकरणानंतर या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलालाही ओढ लागली होती. चलनतुटवडा आणि बाजारातील अस्थिरता यामुळे खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार लांबणीवर टाकण्यात येत होते. परंतु २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपता संपता, मार्च महिन्यात मुद्रांक व्यवहारांत पुन्हा तेजी आल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिनाभरात ठाण्यासह रायगड, पालघर पट्टय़ातून राज्याच्या महसुलात ६३० कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली असून शेवटच्या काही तासांमधील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहता यामध्ये आणखी काही कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. रेडीरेकनरच्या दरात वाढीचे संकेत मिळू लागल्याने महानगर प्रदेश क्षेत्रातील विकासकांनी मोठय़ा प्रमाणावर नोंदणी व्यवहार केल्यामुळे ही वाढ झाल्याचा अंदाज असला तरी महसूल विभागाने उत्पन्नवाढीसाठी राबविलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांचे हे फलित आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने एकटय़ा ठाणे शहरात या दिवशी साडेसहा कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. विशेष म्हणजे, शहापूर, उल्हासनगर, बदलापूर या पट्टय़ात उभ्या राहणाऱ्या काही विशेष नागरी वसाहतींमधील नोंदणीसाठी शनिवार, रविवार या सुट्टय़ांच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नोटाबंदीनंतर प्रत्येक महिन्याच्या महसुलात सरासरी ५० कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घट असताना मार्च महिन्यातील उसळीमुळे सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

नोटाबंदीचा फटका बसलाच!

* २०१५-१६ या आर्थिक वर्षांत १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या कालावधीच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ांत राज्य सरकारला मुद्रांक नोंदणीच्या माध्यमातून २६०० कोटींहून अधिक महसूल प्राप्त झाला होता. गेल्या आर्थिक वर्षांतही (२०१६-१७)  एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत २७०० ते २८०० कोटींच्या आसपास महसूल मिळाला. म्हणजेच सरकारच्या उत्पन्नात वाढ होत होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावल्याने महसुलावर परिणाम दिसून आला.

* नोटाबंदीच्या निर्णयानंतर गतवर्षीच्या तुलनेत सरकारच्या उत्पन्नात दरमहा ५० ते ६० कोटी रुपयांची घट दिसू लागल्याचे चित्र पुढे आले आहे.

* २०१५-१६ या कालावधीत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ातून राज्य सरकारच्या मुद्रांक नोंदणी विभागाचे एप्रिल ते डिसेंबपर्यंतचे उत्पन्न ३७७३ कोटी, जानेवारीत ४१५० कोटी तर फेब्रुवारीत ४५४३ कोटींपर्यंत पोहोचले होते. मार्च महिन्याच्या अखेरीस हा आकडा ५१८४ कोटींच्या घरात पोहचला होता. यंदा मात्र नोटाबंदीनंतर एप्रिल ते डिसेंबरपर्यत तीन जिल्ह्य़ांचा महसूल ३५३० कोटी, जानेवारीत ३८६२ कोटी तर फेब्रुवारी महिन्यात तो ४२०६ कोटी रुपये इतकाच पोहोचू शकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:01 am

Web Title: maharashtra government get rs 630 crore revenue from real estate in march
Next Stories
1 उल्हासनगरात घोडेबाजार?
2 शहरबात-उल्हासनगर : व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा डाव
3 वसाहतीचे ठाणे : तिच्या हाती संकुलाचा गाडा
Just Now!
X