राज्य सरकारचे वनविभागाला सक्त आदेश
दर आठवडय़ाला जंगलातील आगींचे अहवाल देणे बंधनकारक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठाणे, शहापूर तसेच रायगड येथील रोहा परिसरातील दाट जंगलांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने वणवे पेटत असल्याच्या घटनांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी काही सूचना करतानाच याबाबत दररोज उपाययोजना राबवण्याचे आदेशही सरकारने वनाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या वणव्यासंदर्भातील सविस्तर अहवाल दर आठवडय़ाला थेट वनसचिवांकडे सादर करण्याच्या सूचनाही राज्य सरकारने केल्या आहेत.
मुंबई, ठाणे परिसरातील जंगलांना लागणाऱ्या आगींमधून संशयाचा धूर येत असल्याच्या तक्रारी पर्यावरण तसेच वन्यप्रेमींमधून सातत्याने केल्या जात होत्या. साधारणपणे उन्हाळ्याच्या काळात जंगलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वणवे पेटतात असा आजवरचा अनुभव आहे. असे असले तरी फेब्रुवारी ते जून या कालावधीत राज्यातील ठराविक वन क्षेत्रात आगीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या ठाणे, शहापूर तसेच अलिबाग, रोहा यांसारख्या भागातील जंगलांमध्ये सर्वाधीक वणवे पेटल्याच्या तक्रारी असून राज्याच्या वन विभागालाही या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली आहे. शहापूर, अलिबाग, रोहा यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नाशिक वन्यजी या वन क्षेत्रातही आग लागण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. मुंबई, ठाणे, रोहा, अलिबाग अशा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर नागरी संकुले उभी रहात असून अशा वस्त्यांना खेटून असलेल्या परिसरात आग लागण्याचे प्रमाण मोठे असल्याच्या तक्रारी काही संस्थांकडून करण्यात आल्या होत्या.
या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने वणवे रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वणवे आटोक्यात आणण्यासाठी दररोज उपाय राबवावेत तसेच यासंबंधीचे अहवाल दर आठवडय़ाला राज्याच्या वन सचिवांकडे सादर करावेत, असे आदेश वनखात्याने दिले आहेत. याखेरीजही आणखी काही सूचना राज्य सरकारने केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वणवे रोखण्यासाठी..
* वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागातर्फे जाळवेशा हा प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत रस्त्यालगतच्या गवताची कापणी करून तो भाग पेटवण्यात येतो.
* वनविभागातर्फे ‘वॉच टॉवर’ हा उपक्रम वणवे आटोक्यात आणण्यासाठी राबविण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
* वणव्यांचे प्रमाण वाढल्यास प्रत्यक्ष जंगलस्थळी वन विभागाचे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना.
’ वन विभागाने जंगलांमधील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून जागृती पथक तयार क रण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगी मानवनिर्मित
येऊरच्या जंगलात फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोठय़ा प्रमाणात मानवनिर्मित वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरण संस्थांनी केल्या होत्या. दारूभट्टी उभारण्यासाठी जंगल परिसरात वणवे पेटवले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. सतत एकाच ठिकाणी लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government make mandatory to submit forest fire report every week
First published on: 14-06-2016 at 02:49 IST