अतिक्रमण रोखण्यासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव
ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीवर उतारा शोधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयालगत उन्नत रेल्वे स्थानक उभारणीचा निर्णय जवळपास पक्का करीत आणला असतानाच याच भागात असलेल्या मनोरुग्णालयातील मोकळ्या जागेवर नव्याने अतिक्रमण होऊ नये यासाठी राज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय मालकीच्या या जागेवर यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती जागोजागी मोडकळीस आल्याने उर्वरित जागेवर आणखी बांधकामे उभी राहण्याची भीती आहे. उन्नत रेल्वे स्थानकाच्या नियोजनात अतिक्रमणाचा अडथळा उभा राहण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षक भिंतींसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांची लोकसंख्या एव्हाना २० लाखांच्या पलीकडे पोहोचली असून घोडबंदर मार्गालगत उभ्या राहणाऱ्या संकुलांमुळे नागरीकरणाचा वेग भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे आहेत. या वाढत्या लोकसंख्येसाठी ठाण्याला पर्यायी स्थानक असावे, असा प्रस्ताव मध्यंतरी मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने पुढे आणला होता. त्यानुसार ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक उभारण्याचे ठरले. यासंबंधीची आखणीही करण्यात आली. मात्र मनोरुग्णालयाची जागा राज्याच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असल्याने जमिनीच्या हस्तांतरणाचा मुद्दा प्रलंबित असून येथील ७२ एकर जागेपैकी बराचशा जागेवर अतिक्रमणे आहेत. ती हटवावीत आणि त्यावर स्थानकाची उभारणी केली जावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारपुढे पाठविला आहे.

उन्नत स्थानकाचा प्रस्ताव
मध्य रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातासंबंधी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवर प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात नव्या विस्तारित स्थानकाचा सविस्तर आराखडा तयार केला असून त्यानुसार पूर्वद्रुतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ उन्नत स्वरूपात हे स्थानक उभारले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेपैकी आठ एकर जागा अपेक्षित धरण्यात आली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणायचा असेल तर मनोरुग्णालयाची अतिक्रमण मुक्त असलेली जागा संरक्षित करण्यासाठी तातडीने उपाय योजावे लागतील याचे उशिरा का होईना, भान राज्य सरकारच्या आरोग्य विभागास आले आहे. सद्यस्थितीत मनोरुग्णालयाभोवती असलेल्या संरक्षक भिंतींची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपायही आखले जात नसल्याचे चित्र आहे.

या ठिकाणी नव्या भिंतींची उभारणी
बंजारा वस्तीलगत (२९ लाख)
ज्ञानसाधना महाविद्यालय नाला ( ६४ लाख)
एसीसी कंपनीलगत (६६ लाख)
परिचारिका वसतिगृह ( ६७ लाख)
रेल्वे मार्गाची बाजू ( ६३ लाख)
सेवक वसतिगृहालगत ( एक कोटी २५ लाख

जयेश सामंत,