पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या आहेत. देशभरात या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त केला जात असताना एका दहशतवादी संघटनेचं नाव वायफाय कनेक्शनला देण्याचा संतापजनक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे एका तरुणाने केवळ गंमत म्हणून घरातील वायफायला दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तालिबान’चं नाव दिल्याचं समोर आलं आहे.

कल्याणच्या खडकपाडा येथील अमृत हेवन कॉम्प्लेक्स येथे हा प्रकार घडला. वायफाय सर्च करताना कॉम्प्लेक्समधील काही रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. तातडीने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर रहिवाशांनी हा प्रकार व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे कॉम्प्लेक्समधील इतर रहिवाशांना कळवला, परिणामी परिसरात काही काळासाठी भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि वायफायचं नेटवर्क ट्रेस करुन संबंधित 20 वर्षांच्या तरुणाकडे कसून चौकशी केली असता केवळ गंमत म्हणून फोनचं नाव ‘लष्कर ए तालिबान’ ठेवल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्या नावात वेगळेपण जाणवलं म्हणून ते नाव ठेवल्याचं तरुणाने सांगितलं. त्याचं उत्तर ऐकून पोलिसांनी त्याची योग्यरित्या कानउघाडणी केली आणि तातडीने वायफायचं नाव बदलण्याची सूचना केली. त्यानेही तात्काळ नाव बदलण्याचं पोलिसांना आश्वासन दिलं, त्यानंतर पोलिसांनी तरुणाला समज देऊन सोडून दिलं आहे.