शहरातील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा. रहिवाशांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लागावी, या विधायक हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शाखेने गेल्या आठवडय़ापासून शहरासह २७ गावांमध्ये एक लाख कापडी पिशव्या वाटपास सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरात डोंबिवली रेल्वे स्थानक भागात सुमारे ३५ हजार रहिवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्यावर उपाय सुचवलेला नाही. त्यामुळे चोरून लपून व्यापारी, विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. आयुक्तांनी आदेश दिले की तेवढय़ा वेळेपुरते पालिका कर्मचारी प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मोहीम राबवीत आहेत.
त्यामुळे महापालिकेचा प्लॅस्टिक बंदीचा हेतू अजिबात सफल झालेला नाही. रेल्वे स्थानक भागातील प्रत्येक फेरीवाल्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांचे साठे पडलेले असतात. तरी पालिका कर्मचारी ते साठे जप्त करीत नाहीत, अशी खंत मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी व्यक्त केली.
शहर खरोखरच प्लॅस्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी रहिवाशांना पर्याय देणे आवश्यक आहे. यासाठी मनसेने कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रिक्षा वाहनतळ, मॉल्स, दुकाने, बाजारपेठ, बस थांबे, रेल्वे स्थानके या ठिकाणी उभे राहून कार्यकर्ते कापडी पिशव्या वाटप करीत आहेत. या पिशव्यांवर शहर स्वच्छता, पाणी बचत याविषयी घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत.