पाटील-क थोरे द्वयीचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीच्या प्रयोगाला अल्प यश

ठाणे, कल्याण, अंबरनाथ : ठाणे जिल्ह्य़ातील १४३ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पराभवाची धूळ चारत जोरदार धक्का दिला. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून झालेल्या पराभवानंतर सावध झालेले भाजपचे भिवंडीतील खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याचे फलित सोमवारी लागलेल्या निकालांतून समोर आले. याउलट शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील नेते राज्यभर प्रचारदौरे करण्यात मश्गूल राहिल्यामुळे पक्षाला जिल्ह्य़ातील बालेकिल्ले गमवावे लागल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीच्या प्रयोगालाही फारसे यश मिळालेले नाही.

ठाणे जिल्ह्य़ातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत १५८ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात जाहीर झाला. या निवडणुकीत आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर पाच ग्रामपंचायतींनी बहिष्कार टाकला होता. तसेच दोन ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत दोन हजार २३१ उमेदवार उभे होते. या निवडणुकीसाठी शुक्रवारी एकूण ४६९ केंद्रांवर ८० टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली.

तीन वर्षांपूर्वी  जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवून भाजपला धूळ चारली होती. या निवडणुकीनंतर भाजपने वर्चस्व वाढविण्यासाठी कंबर कसली होती. भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे या तिघांनी नियोजनबद्ध निवडणुका लढविल्या. त्याचा फायदा भाजपला झाल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व मात्र या काळात राज्यभर दौरे करत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेला काही ठिकाणी जागा मिळाल्या असल्या तरी, त्या तुलनेत काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे.

भिवंडीत ५६ पैकी ३० भाजपकडे

भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील वळ, आलिमघर, निवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती, तर उर्वरित ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र, खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीला चारीमुंडय़ा चीत केले. तालुक्यातील ३० ठिकाणी भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले असून आणखी चार ठिकाणी युतीच्या माध्यमातून भाजपची सत्ता येणार आहे. तालुक्यातील काल्हेर, शेलार या दोन्ही श्रीमंत ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. दिवेअंजूर, पुर्णा, माणकोली, पिंपळास, झिडके, कुकसे, ओवळी, लामज, लाखिवली, वडघर, डुंगे, जुनांदुर्खी, अंजूर, पिंपळनेर या ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत, तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली.

कल्याण ग्रामीणमध्येही शिवसेना चीत

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडाला. मलंगवाडी परिसरातील नऊ ग्रामपंचायतींमधील ८५ जागांपैकी सर्वाधिक ४३ जागा भाजप, ३० जागा राष्ट्रवादी, सात जागा शिवसेना, पाच जागा मनसेने जिंकल्या आहेत. तसेच बुर्दुल, पोसरी, काकोळे आणि न्हारेण ग्रामपंचायतीत शिवसेनेचा एकही सदस्य निवडून आला नाही. मनसेने पाच जागा जिंकून ग्रामीण भागातील आपले अस्तित्व राखले. राष्ट्रवादीने ३० जागा जिंकून पडद्यामागून शिवसेनेला धोबीपछाड दिला असल्याची चर्चा रंगली आहे.

शहापुरात शिवसेना, राष्ट्रवादी

शहापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन, तर शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. तालुक्यातील दहिवली, चेरपोली, डोळखांब, भावसे आणि आल्यानी या पाच ग्रामपंचायतींमधील ५१ जागांसाठी १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर ३२ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत ७१ उमेदवार रिंगणात होते. पाचपैकी दहिवली, चेरपोली, आल्यानी या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने, तर डोळखांब, भावसे  ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे.

अंबरनाथमध्ये शिवसेना तर मुरबाडमध्ये भाजपची सरशी

ग्रामपंचायत निवडणुकीत अंबरनाथ तालुक्यात शिवसेनेने २७ पैकी १२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर भाजपने ७, राष्ट्रवादी काँग्रेसने ४, मनसेने एक ग्रामपंचायत जिंकली आहे. तसेच महाविकास आघाडीचा प्रयोग ३ ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी ठरला. असे असले तरी शिवसेनेच्या ग्रामपंचायतींची संख्या १८ वरून १२ वर आली आहे.   या तालुक्यातील काही भाग मुरबाड विधानसभा मतदारसंघात येतो. या संघात भाजपचे आमदार किसन कथोरे हे असतानाही येथील १६ पैकी १२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावला आहे, तर कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या ४ ग्रामपंचायतींमध्ये भाजप, ४ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि २ ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. य् धक्कादायक म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठय़ा नेवाळी ग्रामपंचायतीत शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुरबाड तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीमध्ये भाजपने विजय मिळवल्याचा दावा केला आहे.