दहावी परीक्षेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्य़ातून तब्बल ९०.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्हय़ातील विविध भागांमधून यंदा १ लाख ७ हजार ७२० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९७ हजार ४९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी (९२.१२ टक्के) बाजी मारली असून जिल्ह्य़ात मीरा-भाईदर शहरातील सर्वाधिक ९४.८१ टक्के इतक्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मीरा-भाईंदर पाठोपाठ नवी मुंबईनेही दरवर्षीप्रमाणे उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत ९३.७४ टक्क्यांची मजल मारली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणीतून २८ हजार ५०५, प्रथम श्रेणीतून ३२ हजार ८१७, द्वितीय श्रेणीतून २७ हजार २६३ तर तृतीय श्रेणीतून ८ हजार ९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण ठाणे जिल्हय़ातील १ हजार २१४ शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये एकूण ५६ हजार २७९ मुले तर ५१ हजार ४४१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ५० हजार १०५ मुले तर, ४७ हजार ३८९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८०.०३ टक्के इतके आहे. ठाणे जिल्हय़ातून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच ९४.८१ टक्के एवढा निकाल लागला आहे. त्या खालोखाल नवी मुंबई महानगरपालिका (९३.७४ टक्के), अंबरनाथ (९२.१९टक्के), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (९१.७३ टक्के), ठाणे महानगरपालिका (८९.९२ टक्के), कल्याण ग्रामीण (८९.८७ टक्के), शहापूर (८८.१७ टक्के), उल्हासनगर महानगरपालिका (८८.१४ टक्के), भिवंडी (८५.१८ टक्के) आणि भिवंडी ग्रामीण (८४.८६ टक्के) क्षेत्राचा निकाल लागला आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच २१ हजार १६४ विद्यार्थी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. या परीक्षेत ४५ ते ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

सिग्नल शाळेतील विद्यार्थीही यशस्वी

शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या भिक्षेकरी, स्थलांतरित कुटुंबातील मुलांनी अतिशय खडतर परिस्थितीत दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण होत शिक्षणाच्या परिघापासून दूर असलेल्या लाखो मुलांसमोर आदर्श ठेवला आहे.

ठाण्यातील सिग्नल शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी जिद्द, आत्मविश्वास, मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे.

मोहन प्रभू काळे या विद्यार्थ्यांने ७६ टक्के तर दशरथ युवराज पवारने ६४ टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले आहे. हे दोघेही उदरनिर्वाहासाठी सिग्नलवर वस्तू विक्रीचा व्यवसाय करत होते.