करोनामुळे प्रवाशांच्या संख्येत ७५ टक्क्यांनी घट

आकांक्षा मोहिते, लोकसत्ता

ठाणे : शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी ठाणे विभागातून ६३ विशेष बसगाडय़ा सोडल्या होत्या. त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही मिळाले होते. मात्र, यंदा ४९ विशेष बसगाडय़ा सोडल्या असून त्यापैकी केवळ १२ गाडय़ांसाठी आरक्षण नोंदणी झाली आहे. यामुळे प्रवासी संख्येत ७५ टक्क्य़ांनी घट झाल्याने त्याचा फटका महामंडळाला बसला आहे.

कोकणात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणानिमित्त अनेक नागरिक कोकणात जातात. त्यासाठी एक महिन्याआधीच तिकीट नोंदणी केली जाते. तर, प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे दरवर्षी कोकणात विशेष बसगाडय़ा सोडण्यात येतात. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असून या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांना तेथील प्रशासनाने करोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोकणात जाणारे अनेक जण धास्तावले असून त्यांनी यंदा कोकणात जाण्याचे रद्द केले आहे. परिणामी, एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांच्या प्रवासी संख्येत ७५ टक्क्य़ांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी ठाणे विभागातून ६३ जादा गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या आणि यातून विभागाला चांगले उत्पन्नही मिळाले होते, परंतु या वर्षी करोनाकाळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे ठाणे विभागातून केवळ ४९ गाडय़ा सोडण्यात आल्या असून त्यापैकी केवळ १२ बसगाडय़ांचे आरक्षण झाले आहे. त्यामुळे ऐन हंगामाचा काळ एसटी महामंडळासाठी तोटय़ाचा ठरला आहे.

यंदा उत्पन्न कमी

दरवर्षी ठाणे विभागातून कोकणात जाण्यासाठी जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात येते. मोठय़ा संख्येने प्रवासी काही दिवसांआधीच तिकीट नोंदणी करतात. यंदाही जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे, परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे यंदा ठाणे विभागातून केवळ २५ टक्केच गाडय़ा आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी शिमगोत्सवानिमित्त ठाणे विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नात यंदा घट झाली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाणे विभागातून सोडण्यात येणाऱ्या गाडय़ा

दिनांक         गाडय़ा

२६ मार्च        १९

२७ मार्च        १८

२८ मार्च        ८

२९ मार्च        २

३० मार्च        २