६१९ शिक्षक शाळांच्या प्रतीक्षेत; हजर करून न घेणाऱ्या संस्थांची पदे रद्द     

संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांना रुजू करून न घेणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आपल्या अधिकारात पदे भरलेले संस्थाचालक अडचणीत आले आहेत.

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने दरवर्षी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. सन २०१६- १७च्या संचमान्यतेनुसार राज्यात तीन हजार ३३१ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यापैकी एक हजार ४६५ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन पार पडले.

मात्र त्यापैकी केवळ ८४६ शिक्षक प्रत्यक्ष रुजू झाले. ६१९ शिक्षक विविध कारणांनी समायोजन झालेल्या शाळेत रुजू होऊ  शकले नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना पत्र लिहून अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र संबंधित संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यामुळे ६१९ शिक्षकांचे भवितव्य अधांतरी आहे.

  • २०१६-१७च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले परंतु समायोजन होऊ न शकलेले असे राज्यात एक हजार ८६६ शिक्षक आहेत. अधिक हजर करून न घेतलेले ६१९ शिक्षक असे एकूण दोन हजार ४८५ शिक्षक शाळा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच या वर्षीच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची भर पडणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.
  • सध्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून दिले जात असले तरी त्या शाळेत त्यांची हजेरी पटावर नोंद होत नाही. आता २०१७-१८च्या संचमान्यता होण्याच्या मार्गावर आहे. त्यात अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेणाऱ्या शाळांमधील अशा शिक्षकांची पदे रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

२ मे २०१२च्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षक भरतीला शासनाने बंदी घातली आहे. तरीही संस्थाचालकांनी आपल्या शाळांमधील रिक्त जागांवर परस्पर शिक्षक नेमले. त्यामुळे त्या जागेवर अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतल्यास संस्थाचालकांनी नेमलेल्या शिक्षकाला घरी जावे लागेल. त्यामुळेच संस्थाचालक अतिरिक्त शिक्षकांना हजर करुन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र संस्थाचालकांनी अशा प्रकारे शासनाची व नव्या शिक्षकांची फसवणूक करू नये, अशी अपेक्षा शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी व्यक्त केली आहे.

अकोला, ठाणे अव्वल

अकोला जिल्ह्य़ाने अतिरिक्त शिक्षकांचे शंभर टक्के समायोजन केले आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्य़ाचा क्रमांक लागतो. ठाणे जिल्ह्य़ात ९१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ५५ शिक्षकांचे समायोजन झाले आहे.