दुष्काळाचे संकट दूर करून साऱ्या सृष्टीवर हिरवा गालिचा पांघरणारा पावसाळा सर्वानाच हवाहवासा वाटत असला तरी या काळात शहरी भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. ठिकठिकाणी नाले तुंबून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमधून वाट काढणे मुश्कील होते. रस्त्याच्या कडेला असलेले झाड उन्मळून अपघात होण्याचा धोका संभवतो. वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असतो. पावसाळ्यातील या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, महावितरणतर्फे एप्रिल-मे महिन्यात प्रतिबंधात्मक उपाय केले जातात. सध्या अशाच प्रकारची कामे ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जबाबदार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. शिवाय या कामांचे चित्रीकरणही सुरू आहे. अर्थात या कामांची परीक्षा प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावरच होऊ शकणार आहे..

हल्ली वीजपुरवठा हा दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ती एक अतिशय प्राथमिक गरज बनली आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाने वीज पुरवठा खंडीत झाला तर आपली दिनचर्या जणू काही ठप्प होते. पावसाळ्यात असे प्रकार वारंवार घडतात.
अनेकदा सुरक्षितेच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात अखंडीत वीज पुरवठा करणे हे महावितरणपुढे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी महावितरणच्यावतीने उन्हाळ्यातच देखभाल, दुरूस्तीची कामे केली जातात. एप्रिलपासून अशाप्रकारची कामे महावितरणच्या वतीने ठिकठिकाणी सुरू आहेत. आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातही कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडीत होण्याचा फटकाही नागरिकांना सहन करावा लागत आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये महावितरणच्या भांडूप आणि कल्याण परिमंडळातून वीज पुरवठा केला जातो. या दोन्ही परिमंडळाच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरूवात झाली असून यामध्ये प्रामुख्याने वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे महत्वाचे काम हाती घेतले जाते. यासाठी आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून महावितरणचे कर्मचारी शहरातील धोकादायक आणि अडथळा ठरू शकतील अशा फांद्याची छटाई करतात. त्याचप्रमाणे वाकलेल्या वीज पुरवठा खांबांची डागडूजी करण्याचे काम महावितरणकडून केले जाते. तसेच लोंबकळणाऱ्या वाहिन्यांना खेचून त्यांची जमिनीपासूनची उंची कमी करणे, जोडण्यांची पाहणी करून त्यांची दुरूस्ती करणे अशी कामे यातून केली जातात. आत्तापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे तर अनेक आधुनिक सुविधांमुळे पुढील पावसाळ्यातील वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार बऱ्याच अंशी कमी होण्याचा विश्वास महावितरणकडून व्यक्त केला जात आहे.

दुहेरी वीज पुरवठय़ाची व्यवस्था..
महावितरणच्यावतीने शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये आता दुहेरी वीज जोडणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठी आपत्ती उद्भवल्यास एका वाहिनीवरील वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या वाहिनीवरून त्याभागात वीज पुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी अशी व्यवस्था केली गेली असली तरी काही भागात अद्याप जागेअभावी ही सोय उपलब्ध होऊ शकलेली नाही. तसेच महावितरणचा उघडय़ावरील पोल टू पोल पसारा आता कमी होत असून भुमीगत वाहिन्यांची साखळी महावितरणच्यावतीने पुरवण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे शहरामध्ये उघडय़ा वाहिन्या तुटण्याचा त्रास बराचसा कमी झाला आहे.

श्रीकांत सावंत, ठाणे