सर्वाधिक वीजगळती असणाऱ्या आणि वीजवसुली कमी असणाऱ्या वीज वाहिन्यांवरील विजेची हानी कमी करण्यासाठी महावितरणने आता खाजगी तत्वावर मदत घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची मदत घेण्यात येणार आहे. चांगली सुविधा देण्यासाठी अशा सुशिक्षित अभियंत्यांना फिडर फ्रेन्चायजी नेमण्यात येणार असून त्यांच्याकडून मंडळ व विभागीय स्तरावरील विविध स्वरूपाची कामे देण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
ठाणे विभाग १, २, ३, वागळे इस्टेट तसेच भांडूप आणि मुलुंड येथील फीडर फ्रेन्चायजी नेमण्यासाठी २३ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात वागळे इस्टेट येथील सभागृहात हा मेळावा आयोजित केला आहे.
मीटरची नोंदणी, बिलांचे वाटप, नव्या वीज जोडण्या, वीजचोरी पकडणे, थकबाकी अथवा वीज चोरी आढळल्यास वीजपुरवठा खंडीत करणे ही कामे करण्यासाठी महावितरणच्या वतीने खाजगी तत्वावर बेरोजगार अभियंत्यांकडे सोपवले जाणार आहे. फ्रेन्चायजी व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक होणार असून या अभियंत्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची विविध कामे दिली जाणार आहे. लॉटरी पद्धतीने अथवा वर्तुळाकार पद्धतीने ही कामे अभियंत्यांना देण्यात येतील. ही योजना प्रथम प्रायोगिक तत्वावर अंमलात आण्यात येत असून प्रथम एक वर्षांच्या करारावर फ्रेन्चायझी देण्यात येईल. त्यानंतर कामाच्या मूल्यमापनानुसार हा करार कमाल पाच वर्षे म्हणजे पुढील २ वर्षांसाठी दोनदा वाढविण्यीची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. फ्रॅन्चायझी व्यवस्थापकांना मीटर रिडिंग, बील वाटप तसेच सर्वसाधारण देखभाल इत्यादी कामापोटी महावितरणच्या प्रचलित दराने मोबदला देण्यात येणार आहे. त्यांनी फिडरवरील वितरण हानी कमी करून व वीज बिल वसुली वाढविल्यास मिळणाऱ्या अतिरिक्त महसुलातून प्रोत्साहन पर रक्कम त्यांना देण्यात येईल. फिडर व्यवस्थापक तसेच वीज सेवेची विविध कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या सुशिक्षीत वेरोजगार अभियंत्यांनी वागळे इस्टेट येथील ठाणे महामंडळाच्या सभागृहामध्ये नोंदणी करीता उपस्थित राहण्याचे आवाहन भांडुप नागरी परीमंडळाच्या वतीने केले आहे.