30 September 2020

News Flash

३१ डिसेंबरमुळे माहुली किल्ला राहणार बंद; वन्य विभाग आणि ग्रामस्थांचा निर्णय

वन्यजीव सृष्टीमुळे निर्णय

दत्तात्रय भरोदे

शहापूर, दि.२९ (वार्ताहर) : दारू, व्हिस्कीचे ग्लास रिचवून बेफाम धांगडधिंगा करणाऱ्या तळीरामांनामुळे तानसा अभयारण्यातील ऐतिहासिक माहुली किल्ला नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंद राहणार आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहापुरच्या वन्यजीव विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एक दिवस किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वन्यजीवांना मात्र मोकळा श्वास घेता येणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने शहापुरचा वन्यजीव विभाग पहारा देणार आहे.

वन्य श्वापदांसह विविध पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेल्या तानसा अभयारण्यात ऐतिहासिक माहुली किल्ला असून, याठिकाणी पर्यटकांसह गिर्यारोहकांची ये-जा सुरू असते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थात ३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक अशा विविध ठिकाणाहून लोक याठिकाणी येतात. किल्ल्यावर किंवा पायथ्याशी लोकांची गर्दी असते. पण, तळीरामांच्या बेधुंद नाच गाण्यांमुळे, जोरजोरात होणाऱ्या आवाजमुळे तानसा अभयारण्यातील मुक्तसंचार करणाऱ्या वन्य श्वापदांसह पशु, पक्ष्यांना त्रास होतो. तर या झिंग आणणाऱ्या पार्ट्यांमुळे माहुली किल्ल्याची शांतता भंग होऊन तळीरामांनी घातलेला उच्छाद व इतस्ततः कचरा आणि दारूच्या बाटल्या फेकून किल्ल्यावर अस्वच्छता निर्माण होते.

अखेर याची दखल शहापुरच्या वन्यजीव विभागाने घेतली आहे. माहुली गड सुरक्षा आणि वन्यजीव विभाग ठाणे अंतर्गत खर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशावरून माहुली गड ग्राम परिस्थितीकीय विकास समिती यांच्या सहमतीने ३१ डिसेंबरला (मंगळवारी) माहुली गड व परिसरात धांगडधिंगा घालणाऱ्या तळीरामांसह शांतता व पावित्र्य भंग करणाऱ्यांमुळे संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी दिली. माहुली गड बंदला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केली आहे. या निर्णयाचा आदर करावा अन्यथा भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कायद्या अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 6:02 pm

Web Title: mahuli fort will be closed on 31 december bmh 90
Next Stories
1 डोंबिवलीत १२ तासांत २५ हजार वडे तळण्याचा विक्रम
2 …. त्या सर्व रिक्षा दररोज फोडणार, नितीन नांदगावकरांचा इशारा
3 औषध दुकानात चोरटय़ाकडून गोळीबार
Just Now!
X