लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : विद्युत वाहनांच्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने राज्यात विद्युत वाहन चार्जिग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे एक विद्युत वाहन चार्जिग स्टेशन उभारण्यात आले असून मंगळवारी त्याची यशस्वी चाचणी झाली.

प्रदूषण नियंत्रण व राष्ट्रीय इंधन सुरक्षा वाढविण्याबरोबरच परवडणारी तसेच पर्यावरणास अनुकूल वाहतूक पुरविण्यासाठी केंद्र शासनाने ‘नॅशनल मोबिलिटी  मिशन २०२०’ ची सुरुवात केली आहे.  या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यानेही स्वत:चे स्वतंत्र ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण’ जाहीर केले आहे.

या धोरणामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान देण्यासाठी महावितरणने स्वखर्चाने पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये १० विद्युत वाहन चार्जिग स्टेशन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांत एकूण १० चार्जिग स्टेशनची उभारणी केली आहे.

त्याआधी नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये प्रत्येकी एक चार्जिंग स्टेशन प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे उभारण्यात आलेल्या रोमा विद्युत वाहन चार्जिग स्टेशनची चाचणी सोमवारी मोबाईल अ‍ॅपद्वारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

महावितरणने विद्युत वाहनधारकांसाठी एक मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे जवळ असलेल्या चार्जिग स्टेशनची उपलब्धता, चार्जिग स्टेशनपासूनचे अंतर, चार्जिग करण्यासाठी लागणारा वेळ अशा सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे ग्राहकाला चार्जिगसाठी आगाऊ  नियोजन करणे सोयीस्कर होते. तसेच चार्जिग स्टेशन मानवरहित असल्यामुळे या अ‍ॅपद्वारे सेल्फ सर्विस घेणे अत्यंत सुलभ होत आहे. चार्जिगसाठी क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वाहनधारकाच्या मोबाइल अ‍ॅपवर ओटीपी मिळतो. तो ओटीपी टाकून वाहनधारक या विद्युत चार्जिग स्टेशनचा वापर करू शकतो.