विरारमधील गृहप्रकल्प घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अविनाश ढोले याला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक नागरिकांना गृहप्रकल्पात स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात पौडवाल यांनी तक्रार देताच पोलिसांनी कारवाई करून फरार असलेल्या आरोपी ढोले याला अटक केली.

मेसर्स ओम मंदार रिअ‍ॅल्टर्स या कंपनीचे विरारच्या बोळिंज येथील चारभुजा अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. कंपनीचे संचालक अविनाश ढोले आणि त्यांच्या अन्य पाच साथीदारांनी विरारच्या नारिंगी येथे मंदार एव्हेन्यू एफ १ नावाचा गृहप्रकल्प विकसित केला होता. या प्रकल्पात आधुनिक सुखसोयींनी युक्त अशी घरे माफक दरात देण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले होते. मात्र ग्राहकांना विहित वेळेत सदनिका, वाणिज्य गाळ्यांचा ताबा दिला नाही. नमूद सदनिकांच्या नोंदणीकृत सेल्स अ‍ॅग्रीमेंट करून बनावट आणि खोटय़ा दस्तावेजांच्या आधारे एकच सदनिका अनेक जणांना परस्पर विकून त्यांची नोंदणीकृत खरेदीखते बनवून आर्थिक फसवणूक केली होती. एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र कुणाला अटक झालेली नव्हती. प्रसिद्ध पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांचीही या गृहप्रकल्पात ३८ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. पौडवाल यांनी तक्रार दाखल करताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी गुरुवारी मुख्य आरोपी अविनाश ढोले याला अटक केली. या प्रकरणात राजू सुलोरे, किरण सामंत, प्रफुल्ल पाटील आणि अलाउद्दील शेख हे अन्य आरोपी असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

या प्रकरणात कंपनीच्या इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यातील मुख्य आरोपी अविनाश ढोले याला अटक केली आहे.

– जयंत बजबळे, पोलीस उपअधीक्षक, विरार