दिवसा करण्यात येणाऱ्या कामांमुळे प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर रखडलेल्या पादचारी पुलांच्या कामामुळे पादचारी बेजार झाले असतानाच रेल्वे प्रशासनातर्फे  ऐन गर्दीच्या वेळी या सरकत्या जिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भर दिवसा गर्दीच्या वेळेत करण्यात येणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे हे जिने बंद करण्यात येत असून स्थानकातील इतर जिन्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानके ही मध्य रेल्वेची सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. या रेल्वे स्थानकांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी सरकते जिने बसवण्यात आले आहेत.

सध्या ठाणे रेल्वे स्थानकात ८, दिवा रेल्वे स्थानकात १, डोंबिवली रेल्वे स्थानकात २ आणि कल्याण रेल्वे स्थानकात ४ सरकते जिने आहेत. आपत्कालीन कळ दाबणे आणि प्रवाशांचे सामान अडकणे अशा विविध कारणांमुळे हे सरकते जिने नादुरुस्त होण्याचेच प्रमाण जास्त आहे. ठाणे स्थानकातील आठ सरकते जिने तर जुलै महिन्यात तब्बल दहा हजार वेळा बंद पडले होते. या समस्येवर प्रशासनाला ठोस उपाययोजना अद्याप करणे शक्य झालेले नाही. त्यातच अधिकची भर म्हणजे रेल्वे प्रशासातर्फे ऐन गर्दीच्या वेळीच या सरकत्या जिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहेत. भर दिवसा करण्यात येणाऱ्या या कामांमुळे जिने बंद करावे लागत असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यापूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील एक पादचारी पूल, डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि कल्याण रेल्वे स्थानकतील पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे इतर पादचारी पूलांवर मोठी गर्दी होत आहे. दिवसा देखभाल दुरुस्तीमुळे स्थानकातील इतर पूलांवरील गर्दीत अधिक भर पडत आहे. त्यामुळे सरकत्या जिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळी करण्यात यावीत, अशी मागणी रेल्वे प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे.

सरकत्या जिन्यांची देखभाल दुरुस्ती शक्यतो रात्रीच्या वेळी करण्यात यायला हवी. मात्र, ही कामे जर ऐन गर्दीच्या वेळी करण्यात येत असतील तर, त्याबाबत माहिती घेण्यात येईल. तसेच सरकत्या जिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रात्रीच्या वेळी करण्यात यावीत, अशा सुचना रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाला देण्यात येतील. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळच्या आणि सायंकाच्या वेळी रेल्वे स्थानकांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. या वेळेत रेल्वे प्रशासनाकडून सरकत्या जिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकातील इतर पादचारी पुलांच्या जिन्यावर मोठी गर्दी होते. – राजेश कदम, रेल्वे प्रवासी