तळोजा औद्योगिक वसाहतीत मुंबई वेस्ट मँनेजमेंट या घनकच-याचे विघटन करणा-या कंपनीत सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये भूकंपासारखे धक्के बसल्याने भीतीचे वातावरण होते.

तळोजा नावाडा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या कंपनीत औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचा रासायनिक कचरा विघटन करण्यासाठी येतो. रसायनांच्या टाकीला जेसीबीचा धक्का लागल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत जेसीबी चालक संतोष पाटिल हे जखमी झाले असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक तानाजी खेटेकर यांनी दिली. तळोजा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत जेसीबीची टाकी २०० ते ३०० मीटर फेकली गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. सकाळी नाश्त्याची वेळ असल्याने कंपनीतील बहुसंख्य कर्मचारी बाहेर गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या स्फोटानंतर या भागांमधील ग्रामस्थ आक्रमक झाले. ही कंपनी बंद करावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी कंपनीबाहेर निदर्शनं केली. सिद्धि तरवले, घोटचा वाडा, तळोजा मजकूर पेठाली,पेंढर नितळससह कल्याण तालुक्यातील आगासन गावापर्यंत या स्फोटामुळे भूकंपासारखे हादरे जाणवले. ग्रामस्थ पुष्पा भोईर यांच्या सह इतर ग्रामस्थांनी ही कंपनी बंद करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासन येण्याआधी कंपनी प्रशासनाने सगळे पुरावे नष्ट केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या वर्षी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही कंपनी बंद करण्याची मागणी सर्व राजकीय पक्षानी केली होती त्यावेळी कंपनी प्रशासनाने आम्ही ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यासाठी रुग्णालय बांधू असे सांगितले होते. तसेच जवळ तीन ते चार रुग्णवाहिका ठेवू असेही मान्य केले होते. मात्र सोमवारी जेव्हा अपघात झाला तेव्हा जखमी कर्मचाऱ्याला खासगी वाहनातून रुग्णालयात नेले असल्याची माहिती पेंधरचे ग्रामस्थ सूरज गायकर यांनी दिली.