मीरा-भाईंदरच्या महापौरांची घोषणा

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मीरा रोडच्या मेजर कौस्तुभ राणे यांचे मीरा रोड रेल्वे स्थानकासमोरील चौकात स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा महापौर डिंपल मेहता यांनी केली आहे. यासोबतच राणे कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिका सेवेत रुजू करून घेण्याची तसेच मेजर राणे यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्याची घोषणा महापौरांनी केली आहे.

काश्मीरमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी झालेल्या लढाईत मेजर कौस्तुभ राणे यांनी बलिदान केले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर मीरा रोडच्या वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक त्यांच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते. मेजर कौस्तुभ राणे यांनी आपल्या बलिदानाने तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये देशप्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे. कौस्तुभ राणे यांचे नाव शहरवासीयांच्या

मनात कायमस्वरूपी जिवंत रहावे यासाठी मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील चौकात त्यांचे स्मारक उभारण्यात येईल, तसेच महापालिकेच्या एका वास्तूला शहीद मेजर कौस्तुभ प्रकाश राणे असे नाव देण्यात येईल, अशी माहिती महापौर डिंपल मेहता यांनी दिली.

राणे कुटुंबाने संमती दिली तर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिका सेवेत रुजू करून घेण्यासाठीची कार्यवाही महापालिका सुरू करेल तसेच कुटुंबाने परवानगी दिल्यास मेजर राणे यांच्या चिरंजीवाला शिष्यवृत्ती देऊन त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिका अभिमानाने करेल, असेही डिंपल मेहता यांनी घोषित केले.