अनधिकृत रिक्षा थांबे, पार्किंग, फेरीवाल्यांचे बस्तान

ठाणे वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाचे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात हाती घेतले आहेत, मात्र तरीही महत्त्वाच्या चौकांत फेरीवाले, अनधिकृत रिक्षा थांबे, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी कायम आहे.  मोक्याच्या चौकांत फेरीवाल्यांनी पुन्हा आक्रमण केले आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, गावदेवी चौक, कळवा नाका, शास्त्रीनगर, जांभळीनाका येथे अतिक्रमण झाले आहे.

अरुंद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांचे बस्तान, अनधिकृत रिक्षा थांबा आणि रिक्षाच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेली प्रवाशांची रांग, यामुळे गावदेवी चौक कायम गर्दीच्या फेऱ्यात अडकलेला असतो. हनुमान मंदिराच्या जवळच पवारनगर, नितीन कंपनी या ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षांचा थांबा आहे, मात्र गावदेवी मैदानाच्या दिशेकडे जाणाऱ्या चौकातच रिक्षाचालक रस्त्याच्या मध्यभागापर्यंत रिक्षा उभ्या करतात. तिथूनच ठाणे परिवहनच्या बस रेल्वे स्थानकाकडे जातात. आधीच अरुंद असलेल्या रस्त्याचा काही भाग रिक्षावाल्यांनी अडवल्यामुळे एकाच वेळी अनेक वाहने आल्यास ती वळवताना अडथळे येतात. याशिवाय लोकमान्यनगर, इंदिरानगर या ठिकाणी जाण्याचा अनधिकृत रिक्षा थांबा याच भागात आहे. डॉ. आंबेडकर उड्डाणपुलाखाली खोपट, शिवाईनगरच्या रिक्षा थांबून वाहतूककोंडी होते.

शास्त्रीनगरमध्ये फेरीवाले, पोखरण रस्त्यावर पार्किंग

पोखरण रस्त्यावर रुंदीकरणाचे काम अद्याप सुरूआहे. मात्र तिथेच ट्रक, टेम्पो, शाळेच्या बस पार्क केल्या जातात. सिंघानिया शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागातर्फे देण्यात आले असले, तरी हा रिक्षा थांबा अद्याप सुरूआहे. शास्त्रीनगर चौकात रुंदीकरणासाठी रस्ता मध्यभागापर्यंत खोदलेला आहे. त्यामुळे उपवनच्या आणि देवदयानगरच्या दिशेने वाहतुकीसाठी अरुंद रस्ता उरला आहे. याच रस्त्यावर भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ठाण मांडले असून सायंकाळी तिथे कायम वाहतूक कोंडी असते. वाहन चालवण्यासाठी तसेच नागरिकांना चालण्यासाठी अडथळा होत असल्याचे या ठिकाणाहून नियमित प्रवास करणारे भावेश मारूयांनी सांगितले.

रस्त्यावरील वाहतूक सुरळित व्हावी यासाठी रोड क्लिअरिंग मोबाइल वाहन या विशेष चौकांमध्ये फिरत असते. मुख्य चौकात होणारी वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होतो. मात्र वाहन या चौकातून निघून गेल्यावर वाहनांच्या गर्दीमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होते. गावदेवी चौकात डाव्या बाजूच्या रांगेत २५ रिक्षांसाठी जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक विभागाचा एक शिपाई नेमण्यात आलेला आहे.

– संदीप पालवे, उपायुक्त वाहतूक पोलीस विभाग, ठाणे