09 December 2019

News Flash

महामुंबईच्या वेशीवर कोंडी

आनंदनगर ते माजीवडा हे १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास लागत होता.

मुंबई, ठाणे, शीळफाटा येथे वाहन चालक, प्रवासी मेटाकुटीला

मुंबई/ठाणे : स्वातंत्र्यदिनाला लागून आलेल्या सुट्टय़ा, बहुतेक महामार्ग आणि शहरांतील खड्डेमय रस्ते, सुरक्षिततेच्या कारणास्तव ठिकठिकाणी सुरू असलेली नाकेबंदी आणि या सगळ्याच्या जोडीला बेसुमार अवजड वाहनांचा अनिर्बंध शहरप्रवेश या विविध घटकांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली-कल्याण या बहुतेक शहरांच्या वेशींवर आणि मुख्य भागांमध्ये बुधवारी सायंकाळी आणि रात्री अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या कोंडीतून मार्गक्रमण करताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला. कोंडीचे हे पर्व आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.

रस्तोरस्ती पसरलेले खड्डय़ांचे साम्राज्य आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेसह सुरू असलेल्या अन्य कामांचा फटका बुधवारी मुंबईतील रस्ते वाहतुकीला बसला. शहरातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. रात्री उशीरापर्यंत हा वाहतूक खोळंबा कायम होता.

काही दिवसांपूर्वी मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे लहान-मोठय़ा सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला कासवगती आली आहे. या खड्डय़ांतील डांबरमिश्रित खडी रस्त्यांवर पसरली असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मालाडजवळील बाण डोंगरीत मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे. त्यासाठी पाच ते सहा क्रेन द्रुतगती महामार्गाच्या मधोमध उभ्या होत्या. त्यामुळे आधीच अरुंद झालेला रस्ता आणखी चिंचोळा झाला होता. हीच परिस्थिती समता नगर, दहिसर येथील अशोक वन परिसरातही होती. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी प्रचंड कोंडी होती.

पूर्व उपनगरांतील  रहिवाशांनाही खड्डे, मेट्रो प्रकल्पाची कामे आणि बंद पुलांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील कासारवडवली ते वडाळा आणि शीव – पनवेल मार्गावर डी. एन. नगर ते मानखुर्द, वडाळा या ‘मेट्रो-२ बी’चे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर जंक्शन, कुर्ला उड्डाणपूल, अमर महल या परिसरातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर शीव – पनवेल मार्गावर चेंबूरमधील उमरशी बाप्पा चौकापासून चेंबूर नाका, मैत्री पार्क, पांजरापोळ जंक्शन आणि देवनार डेपोपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सुमन नगर ते देवनार डेपो हे अंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांचे असताना वाहनांना या परिसरातून बाहेर पडण्यासाठी अर्धा ते पाऊणतास  लागत आहे.

एकीकडे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढलेली असताना, पालिकेने दोन महिन्यापूर्वी घाटकोपर डेपोजवळ लक्ष्मीनगर नाल्यावरील पूल धोकादायक असल्याचे कारण देत बंद केला. सध्या तो हलक्या वाहनांसाठी खुला आहे. मात्र कोंडीची समस्या कायम आहे. अशाच प्रकारे टिळकनगर आणि विद्याविहारला जोडणारा नीलकंठ नाल्यावरील पूलही पालिकेने दोन महिन्यापूर्वी बंद केला आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये अधिकच वाहतूक कोंडी वाढली आहे.

ठाणे कोंडलेलेच

ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर बुधवारी रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने आनंदनगर टोलनाक्यापासून ते माजिवाडय़ापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही झाला. या कोंडीमुळे दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तासांचा अवधी लागत होता. अशीच अवस्था शीळफाटा मार्गावर होती. नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त कळवा भागातील वाहतुकीत केलेले मोठे बदल, रस्त्यावरील खड्डे आणि रात्रीच्या वेळेत सुरू झालेली अवजड वाहतूक या कारणांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवाडा उड्डाणपुलावर सायंकाळी एका मोटारीचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. आनंदनगर ते माजीवडा हे १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास लागत होता.

कळवा परिसरातील रस्ते नारळी पौर्णिमा उत्सवासाठी बंद करून तेथील वाहतूक ऐरोली-आनंदनगर मार्गे वळविण्यात आली होती. त्यात सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाच्या वाहनांचा भारही पडला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

ठाणे स्थानकात कोंडी

ठाणे पश्चिम स्थानकातील सॅटीस पुलावरून बस वाहतूक होते. बुधवारी सायंकाळी जांभळी नाका येथील सॅटीस पुलाच्या मार्गिकेजवळ राज्य परिवहन उपक्रमाची बस बंद पडली. यामुळे पाठीमागे वाहनांच्या लांब रांगा लागून कोंडी झाली. त्याचा फटका आसपासच्या मार्गावरील वाहतुकीला बसला. तसेच बंद पडलेल्या बसच्या पाठीमागे इतर बसगाडय़ा अडकून पडल्या आणि सॅटीस पुलावरून बसगाडय़ांची वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नागरिकांना बसची वाट पहात ताटकळत उभे रहावे लागले. अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक पोलिसांनी बंद पडलेली बस क्रेनच्या साहय्याने बाजूला केली आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. मात्र, ही कोंडी उशीरापर्यंत सुटलेली नव्हती. कोंडीमुळे स्थानकात रिक्षा येत नव्हती. त्यामुळे स्थानकातील रिक्षा थांब्यांवर रात्री ११ वाजेपर्यंत प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.

First Published on August 15, 2019 2:01 am

Web Title: major traffic congestion in thane thane faces heavy traffic congestion zws 70
Just Now!
X