उन्हाने अंगाची काहिली होत असताना हातगाडीवर दिसणारा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह झाला नाही तर नवलच. हातगाडीवर मिळणारा हा गोळा त्यासाठी वापरले जाणारे पाणी हे आरोग्यास हानीकारक होऊ शकते, म्हणून अनेक जण आपल्या जिभेला आवर घालतात. मात्र, आता बाजारात चक्क ‘इन्स्टंट’ गोळा मिक्स पाकिटे उपलब्ध झाली असून बर्फाचा गोळा बनवून खाण्याची इच्छा घरच्या घरी पूर्ण करणे शक्य झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत आइस्क्रीम, शीतपेये, लिंबू सरबत यांच्यासोबत बर्फाचा गोळाही चवीने चाखला जातो. चौपाटय़ा, बगिच्याच्या दारात तर हमखात गोळेवाल्याची गाडी लागलेली पाहायला मिळते. त्यांच्याकडे मिळणाऱ्या काला खट्टा, ऑरेंज, लेमन, कच्ची कैरी आदी चवींच्या रसांनी भरलेला गोळा खाण्यासाठी झुंबड उडते. मात्र, या गोळ्यातील बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी, रसांमधील घटक याबाबत आरोग्यतज्ज्ञ नेहमी शंका उपस्थित करत असतात. आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या भीतीने अनेक जण इच्छा असूनही बर्फाच्या गोळ्याकडे पाठ फिरवतात. मात्र, आता बाजारात गोळ्यांची तयार पाकिटेच मिळण्यास सुरुवात झाली आहे.
एका पाकिटात उपलब्ध असणाऱ्या सामग्रीमध्ये चार ते पाच गोळे तयार होत असल्याने संपूर्ण कुटुंब गोळ्याचा एकत्रित आनंद घरबसल्या घेऊ शकते. रेडीमेट मिळणाऱ्या या पाकिटामध्ये ऑरेंज, मँगो, कालाखट्टा, जिरा सोडा, ब्लू लेमन, रिमझिम कोला, कच्चा कैरी असे एकूण दहा प्रकार उपलब्ध आहेत. रेडीमेड पॅकेटमधील पदार्थ पाण्यात मिसळून डिप फ्रिजरमध्ये दोन तास ठेवले की गोळा तयार होतो. त्याची चवही गाडीवर खातो त्या गोळ्यासारखीच लागते.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली